घरताज्या घडामोडीलॉकडाऊन दरम्यान धारावी, व्हाया कल्याण केला प्रवास

लॉकडाऊन दरम्यान धारावी, व्हाया कल्याण केला प्रवास

Subscribe

या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून क्वारंटाईनमध्ये रवानगी केली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासन प्रशासनाकडून सर्वतोपरी लढा सुरू असतानाच नागरिकांनी घरीच राहावे घराबाहेर पडू नये असे सातत्याने आवाहन केले जात आहे. तरी देखील अनेकांना याविषयीचे गांभीर्य नसल्याचेच दिसून येत आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट समजले जाणाऱ्या मुंबईतील अतिसंवेदनशील परिसर समजला जाणाऱ्या धारावीतून मोटारसायकलवरून कल्याणला प्रवास केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी एक महिला आणि पुरूष या दोघांवर कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या दोघांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे.
मुंबईत कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. या संचारबदींच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता सामान्य नागरिकांना आणि वाहनांने प्रवास करण्यास मनाई आहे. तसेच सर्वत्रच जिल्हा बंदीचाही आदेश लागू आहे. महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनीदेखील कोरोना कंटेंनमेंट झोनमधील नागरिक इतर भागात गेल्याचे आढळून आल्यास त्यांना महापालिकेच्या क्‍वारंटाईन कक्षात दाखल करून १४ दिवस ठेवण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. त्यानंतरही डोंबिवली येथे राहणाऱ्या आणि धारावी येथे काम करणाऱ्या एका व्यक्तीने धारावीसारख्या कोविड अतिसंवेदनशील भागातून एका महिलेला दुचाकीवरून अटाळी-आंबिवली येथे आणून सोडले.

खडकपाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल
या व्यक्तीने कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या आदेशाचे जाणीवपूर्वक पालन न करता धारावी- मुंबई ते अटाळी-आंबिवली असा प्रवास करून संचारबंदीचे उल्लंघन केल्याने दोन्ही व्यक्तीविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ च्या अनुषंगाने भंग केल्यामुळे कोविड-१९ उपाययोजना २०२० नियम ११ नुसार भारतीय दंड संहिता (५४ ऑफ १८६०) कलम १८८, २६९, २७० आणि साथीरोग प्रतिबंधक कायदा १९९७ चे कलम २, ३ आणि ४ अन्वये खडकपाडा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती महापालिकेतर्फे देण्यात आली आहे. तसेच या इसमाला आणि महिलेला टाटा आमंत्रा येथे क्‍वारंटाईन कक्षात ठेवण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -