महाराष्ट्रातील ईडी सरकार शेतकरी विरोधी, नऊ महिन्यात आत्महत्या वाढल्या – नाना पटोले

विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल रमेश बैस यांचे अभिभाषण झाले. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले.....

राज्यपालांच्या अभिभाषणातून शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांना आधार देईल असं वाटलं होतं, मात्र तसं घडताना दिसत नाही. शेतकरी आत्महत्या करत आहे. कांदा, कापूस, धान उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत. मात्र त्याला न्याय देताना हे सरकार दिसत नाही. कांदा हमी भावानं खरेदी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. शेतकरी विरोधी सरकारला जाब विचारणार आहोत, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केली.

विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल रमेश बैस यांचे अभिभाषण झाले. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले, राज्यपालांच्या अभिभाषणातून शेतकरी हिताचे काही निर्णय हे सरकार घेईल, शेतकऱ्यांना न्याय देईल अशी अपेक्षा होती, मात्र राज्यपालांच्या अभिभाषणाने ती फोल ठरली. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं नसल्याची टीका पटोलेंनी केली.

शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारं हे ‘ईडी’ सरकार असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. राज्यात वीजेचे दर वाढवले जात आहे. खते, बी-बियाणांचे भाव वाढवले जात आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. यावर सरकाला जाब विचारला जाईल, असा इशारा पटोलेंनी दिला.

प्रदेश काँग्रेसमध्ये वाद नाही – पटोले
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही, माध्यमातून तो निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप पटोलेंनी केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे विधान परिषद निवडणुकीदरम्यान नाराज असल्याची चर्चा होती. थोरातांचे भाचे आणि युवक काँग्रेसचे माजी नेते सत्यजीत तांबे यांच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ उमेदवारीवरुन थोरात-पटोले वादाची चर्चा सुरु झाली होती. दरम्यान सत्यजीत तांबे अपक्ष विजयी झाले आहेत. थोरातांनीही राजीनाम्याची चर्चा फेटाळून लावली आहे.

कसबा-चिंचवडमध्ये जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न – पटोले
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतून या सरकारचा कारभार समोर आला आहे. जनतेलाही पैशांच्या जोरावर विकत घेण्याची यांची तयारी आहे. पोलिसांच्या मदतीने कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार समोर आला. याला जनता उत्तर देईल, असंही पटोले म्हणाले. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे नाना काटे उमेदवार आहेत. कसबा मतदारसंघात भाजपकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप पटोलेंनी केला.