शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्याचा मृत्यू

शाळेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Deepak Gupta

शैक्षणिक सहलीत दहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शाळा व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यासाठी उद्रेक केला. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
नालासोपारा(पूर्व) ओसवालनगरीतील नवजीवन शाळेची शनिवार, १२ जानेवारी रोजी ठाण्याच्या सूरज वॉटर पार्कमध्ये सहल गेली होती. या सहलीत दहावीतील विद्यार्थी दिपक रामचंद्र गुप्ता याचा अपघाती मृत्यू झाला. ही बातमी पसरल्यावर पालकांनी शाळेकडे धाव घेतली. त्यानंतर दिपकचा मृतदेह नालासोपारात आणून शवविच्छेदन केल्यावर तो पालकांच्या ताब्यात देण्यात आला. कित्येक विद्यार्थी या सहलीला जाण्यासाठी तयार नव्हते. त्यांना शाळेने बळजबरी केली. त्यामुळे दिपकला आपला जीव गमवावा लागला. या भावनेतून हजारो नागरिक शाळेत जाब विचारण्यासाठी दाखल झाले.

विद्यार्थ्यांना धाक दाखवून शाळेच्या व्यवस्थापनाने सहलीला नेले. त्यानंतर पाण्यात उतरताना शाळेने आवश्यक ती खबरदारी घेतली नाही. त्यामुळे शाळेवर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि दिपकच्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी करत नागरिकांनी शाळेच्या आवारात उद्रेक केला. त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठामारही करावी लागला. अखेर तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर नागरिकांचा संताप ओसरला.

बळजबरीने विद्यार्थ्यांना सहलीसाठी नेण्यात आले आणि त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात आली नाही. दिपकचा मृत्यू नसून घातपात असल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला. त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल केला आहे.
– दत्ता तोटेवाड, पोलीस उपअधिक्षक