कौतुकास्पद: हृदयाला छिद्र असलेल्या मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी एकनाथ शिंदेची मदत

eknath shinde celebrate birthday with undergoing heart surgery childrens
राज्याचे नगर विकास मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज (दि. ९ फेब्रुवारी) वाढदिवस. या निमित्ताने हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची आज मोफत 2D इको तपासणी करण्यात आली. यापैकी निदान झालेल्या १०० हून अधिक बालकांची हृदय शस्त्रक्रिया उद्यापासून ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पार पाडली जाणार आहे. ज्युपिटर हॉस्पिटलमधील डॉ. श्रीनिवास सर आणि डॉ. आशुतोष सिंग या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाद्वारे या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. याच लहान मुलांच्या हस्ते केक कापून आज नगरविकास आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिबीराचे उदघाटन करण्यात आले.

राज्य शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत या लहान मुलांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. तसेच वाढीव निधीची आवश्यकता असल्यास गरजू रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी , सिद्धिविनायक ट्रस्ट, रोटरी क्लबच्या माध्यमातून अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खा डॉ. श्रीकांत शिंदे, ज्युपिटर हॉस्पिटलचे सर्वेसर्वा सीईओ अजय ठक्कर, अंकित ठक्कर, ठाणे जिल्हाधिकारी राधाकृष्ण नार्वेकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील, आरोग्य विभागाच्या उपसंचालक डॉ. गौरी राठोड , सिव्हिल सर्जन डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेंगे सर, रोटरी क्लबचे आंनद माने यांची प्रमुख उपस्थिती होती. तर श्री सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.