ट्रोल होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले….

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला.

पुण्यात गेल्या तीन दिवसांपासून एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू केले. ही परीक्षा नव्या अभ्यासक्रमानुसार न घेता ती जुन्या अभ्यासक्रमानुसार घेण्यात यावी, अशी या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनावधानाने भलतंच काही बोलून गेले. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला. सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ट्रोलिंगही झालं. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे येत यावर स्पष्टीकरण दिलंय.

एमपीएससीच्या नवीन शैक्षणिक पॅटर्ननुसार यंदाच्या वर्षापासून परीक्षा घेण्यास विद्यार्थ्यांनी विरोध करत पुण्यात आंदोलन सुरू केले. वेळोवेळी आंदोलन करूनही सरकारने दखल न घेतल्याने अखेर सोमवारी सकाळपासून बालगंधर्व चौकात विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. एकनाथ शिंदे यांनी हा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर दिल्यावर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन रात्री उशिरा मागे घेतले. पण त्यानंतर एकनाथ शिंदे सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागले.

पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं सुरू असलेल्या आंदोलनावर जेव्हा माध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया घेतली, त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्याकडून एक चूक झाली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसोबत मी स्वतः बोललो. जी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली, तिच भूमिका सरकारची देखील आहे. ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्ह या दोन पद्धतीबाबत काही सूचना आल्या आहेत. 2025 पासून जी नवी पद्धत सुरु करण्यात येणार होती, त्याबाबत आम्ही निवडणूक आयोगाला पत्र दिले असून त्यांना कळवले आहे.” विशेष म्हणजे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या विषयावर एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाला पत्र दिल्याचं एकदा नव्हे तर तीनदा उच्चार केला. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नक्की काय म्हणायचं होतं? यावरून साऱ्यांचा गोंधळ उडाला.

यावरून एकनाथ शिंदेंवर मोठ्या प्रमाणात टीकाही सुरू झाली होती. ‘यांना उठता, बसता, खाता, पिता, झोपता, जागता, जाता, येता, बोलता फक्त आणि फक्त निवडणूक आयोगच दिसतो वाटतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांचे निवेदन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला देण्याऐवजी निवडणूक आयोगाला पाठवलं, यातच सगळं आलं, असं देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसने म्हटलं होतं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागला. एमपीएससीच्या ऐवजी एकनाथ शिंदे निवडणूक आयोग बोलून गेले त्यावर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर आता एकनाथ शिंदेंनी यावर स्पष्टीकरण दिलंय. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, एमपीएससीच्या प्रश्नावर आम्ही तोडगा काढतोय याबाबत मुलांनाही बोललो आहे. माध्यमांशी बोलताना माझ्याकडून एमपीएससीचा विषय सुरू असताना निवडणूक आयोग हे माझ्याकडून अनावधानाने शब्द निघाले आहेत.” सध्या निवडणूक आयोग, कोर्ट या गोष्टी जोरात चालू असल्यामुळे असे चुकून शब्द केल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या ट्रोलिंगनंतर एकनाथ शिंदेनी सर्वांची माफी मागितली आहे.