HomeमुंबईEknath Shinde : स्वच्छतेतही मुंबईचं जगात नावलौकिक व्हावं; मुख्यमंत्र्यांची अपेक्षा

Eknath Shinde : स्वच्छतेतही मुंबईचं जगात नावलौकिक व्हावं; मुख्यमंत्र्यांची अपेक्षा

Subscribe

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेने सुरू केलेली संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम ही मुंबईकरांच्या उत्‍तम, निरोगी आरोग्‍यवर्धनासाठी उपयुक्‍त आहे. त्याचे दृश्य आणि दूरगामी परिणाम दिसतील. मुंबई महानगराचा स्वच्छतेसाठी देखील जगात नावलौकिक झाला पाहिजे, हे ध्येय ठेवून ही मोहीम सुरु केली आहे. ती यशस्वी होण्यासाठी फक्त शासन अथवा महापालिकेच्या प्रयत्नांपुरती ती मर्यादीत राहून चालणार नाही तर त्यामध्ये समाजाचा सहभाग लाभला पाहिजे, अशी अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. (Mumbai should be renowned in the world for cleanliness as well Expectations of the Chief Minister Eknath Shinde)

मुंबई महापालिकेने दर आठवड्याच्‍या शनिवारी प्रत्‍येक परिमंडळातील एका प्रशासकीय विभागात (वॉर्ड) संपूर्ण स्‍वच्‍छता मोहीम (डीप क्लिनिंग ड्राइव्ह) राबविण्‍यास 3 डिसेंबरपासून प्रारंभ केला आहे. या मोहीमच्या अंतर्गत मुंबईतील पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या स्वछता कामांची पाहणी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (9 डिसेंबर) सकाळी 7 ते दुपारी 12 या पाच तासांच्या दौऱ्यात ठिकठिकाणी भेट देवून केली. तसेच, स्वच्छता कर्मचारी हे खरे नायक तर विद्यार्थी हे स्वच्छतेचे सदिच्छादूत असल्याची आपली भावना असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

हेही वाचा – MLA Disqualification Case : एकनाथ शिंदे यांचे मुख्य नेतेपद बेकायदेशीर; उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांचा दावा

महापालिकेच्‍या पाच प्रशासकीय विभागातील पाच वॉर्डांमध्ये शनिवारी स्वच्छता मोहीम राबवली गेली. परिमंडळ 3 मध्‍ये के/पूर्व विभाग, परिमंडळ 4 मध्‍ये के/पश्चिम विभाग, परिमंडळ 5 मध्‍ये एम/पश्चिम विभाग, परिमंडळ 6 मध्‍ये एन/विभाग आणि परिमंडळ 7 मध्‍ये आर/दक्षिण विभागात विशेष स्‍वच्‍छता करण्यात आली. या कामांची पाहणी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

यावेळी, जुहू चौपाटी येथील महात्‍मा गांधी यांच्‍या पुतळयाला पुष्‍पहार अर्पण करून दौऱयाचा आरंभ करण्‍यात आला. यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी जुहू चौपाटीच्या स्वच्छतेची पाहणी केली. तसेच स्वतः ट्रॅक्टर चालवून बीच क्लिनिंग मशीनच्या सहाय्याने चौपाटीवर स्वच्छता केली. जुहू स्थित इस्कॉन मंदिराला भेट देवून दर्शन घेतल्यानंतर जुहू मधील ‘आय लव्ह मुंबई’ शिल्पाकृतीला देखील त्यांनी भेट दिली.

हेही वाचा – Gopichand Padalkar : इंदापूरमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पलफेक; मराठा समाज आक्रमक

तसेच, विलेपार्ले (पूर्व) मधील नेहरु रस्ता येथे मुख्यमंत्री यांनी स्वतः पाईप हातात घेऊन जेट स्प्रेच्या सहाय्याने रस्ता पाण्याने धुतला. पुढे, वि. स. खांडेकर मार्गावर उड्डाणपुलाखाली करण्यात आलेल्या सुशोभीकरणाच्या ठिकाणी विठूरायाची प्रतिमा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा यांना वंदन केले. विलेपार्ले (पूर्व) मधील शहाजीराजे महानगरपालिका शाळेच्या आवारात भेट देवून त्यांनी विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन केले. स्वच्छता जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी झळकावलेले संदेश पाहून तसेच लेझीमचे प्रात्यक्षिक पाहून मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले.

…तर ‘त्या’ कंत्राटदारावर कारवाई करणार – मुख्यमंत्री

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंधेरी पूर्व- पश्चिमेला जोडण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या गोपाळकृष्‍ण गोखले रेल्वे उड्डाणपूल बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. या उड्डाणपुलाचा पहिला गर्डर स्थापित केल्यानंतर, पहिली मार्गिका वेळेत सुरु करण्याच्या दृष्टिने महापालिकेने निश्चित केलेल्‍या कालावधीत कामे पूर्ण करावीत, रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करुन दिलेल्या रेल्वे वाहतूक ब्लॉकचा योग्य वापर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले. नियोजनाप्रमाणे काम पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्थानिक नागरिकांना आश्वस्त केले.

स्‍वच्‍छता मोहिमेसाठी तीस हजार कर्मचारी रस्त्यावर

एन विभागात घाटकोपर (पूर्व) मधील माता रमाबाई आंबेडकर नगरात मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. प्रारंभी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर, रस्ता क्रमांक एक येथे मुख्यमंत्री महोदयांनी जेट स्प्रेच्या सहाय्याने पाणी फवारणी करुन रस्ता स्वच्छता केली. मुंबईतील स्वच्छतेचे खरे ‘हिरो’ अर्थात नायक हे स्‍वच्‍छता कर्मचारी आहेत, तर विद्यार्थी हे सदिच्छादूत अर्थात ब्रॅण्ड ऍम्बेसेडर असल्याचा पुनरूच्‍चार करताना मुख्‍यमंत्री म्‍हणाले की, संपूर्ण स्‍वच्‍छता मोहिमेसाठी तीस हजार कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीतील तसेच निवासस्‍थानांचा प्रश्‍न सोडवला जात आहे. कामगारांच्या वसाहतींमध्‍ये आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा पुरवल्या जात आहेत. त्‍यांच्‍या मुलांच्‍या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध योजना राबवित आहोत, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

हेही वाचा – OBC Reservation : आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांनी दिली ओबीसी बांधवांना शपथ

याप्रसंगी, राज्‍याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार अमीत साटम, आमदार पराग अळवणी, आमदार राम कदम, आमदार पराग शहा, आमदार प्रकाश सुर्वे, माजी मंत्री दीपक सावंत, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव, सहआयुक्त (परिमंडळ 3) रणजीत ढाकणे, उपआयुक्त (परिमंडळ 4) विश्‍वास शंकरवार, उपआयुक्त (परिमंडळ 6) देविदास क्षीरसागर यांच्यासह संबंधित सहायक आयुक्त व अधिकारी, तसेच मान्यवर उपस्थित होते.