मुंबई : सुमारे चार कोटीच्या ड्रग्ज तस्करीप्रकरणी अकरा आरोपींना मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्यांनी अटक केली. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. अटकेनंतर या सर्वांना किल्ला न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिसांनी चरस, हेरॉईन, एमडी, कोकेन आणि कोडेन फॉस्फेटमिश्रीत कफ सिरप बॉटल्सचा साठा जप्त केला आहे. (eleven persons arrested in connection with drug trafficking worth four crores; cough syrup mixed with hashish, heroin, ganja, MD cocaine seized)
11 डिसेंबर रोजी मानखुर्द आणि गोवंडी परिसरात घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांनी कारवाई करून चरस विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली. या कारवाईत पोलिसांनी 4 कि. 669 ग्रॅम वजनाचे चरस जप्त केले असून त्याची किंमत एक कोटी चाळीस लाख रुपये इतकी आहे. त्यानंतर आझाद मैदान युनिटने धारावी येथून एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 2 हजार 397 कोडेन फॉस्फेटमिश्रीत कफ सिरपच्या बॉटल्स जप्त केल्या आहेत. त्याची किंमत सुमारे बारा लाख रुपये इतकी आहे.
हेही वाचा – Ramdas Athawale : डॉ. आंबेडकरांवरील विधानावरून विरोधकांनी शहांना घेरले, रामदास आठवले काय म्हणाले
तिसर्या कारवाईत कांदिवली युनिटच्या अधिकार्यांनी मालाडच्या मालवणी परिसरात कारवाई करून हेरॉईन विक्रीसाठी आलेल्या एका ड्रग्ज तस्कराला ताब्यात घेतले होते. त्याच्याकडून पोलिसांनी सव्वाकोटीचे 305 ग्रॅम वजनाचे हेरॉईन जप्त केले होते. अशाच अन्य एका कारवाईत कांदिवली युनिटने अंधेरीतील मरोळ परिसरातून कोकेनसह एका नायजेरीयन नागरिकाला अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी 136 ग्रॅम वजनाचे कोकेन जप्त केले. त्याची किंमत 68 लाख 15 हजार रुपये इतकी आहे.
एमडी ड्रग्ज कारवाईत वरळी, आझाद मैदान, घाटकोपर आणि कांदिवली युनिटने काळाचौकी, सायन-धारावी लिंक, माझगाव-डॉकयार्ड रोड, अंधेरीतील डी. एन नगर, अंधेरी डोंगर आणि मरोळ परिसरात कारवाई करून 296 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले. या कारवाईत पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. त्यानंतर गोवंडीतील अन्य एका कारवाईत घाटकोपर युनिटने 660 ग्रॅम वजनाच्या गांजासह अन्य एका आरोपीस अटक केली. अशाप्रकारे मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मानखुर्द, गोवंडी, धारावी, मालाडच्या मालवणी, अंधेरीतील मरोळ, काळाचौकी, सायन, माझगाव-डॉकयार्ड, अंधेरी डोंगर, गोरेगाव-संतोषनगर, गोवंडी शिवाजीनगर, अंधेरीतील डी. एन नगर परिसरातून 4 किलो 669 ग्रॅम वजनाचे चरस, 2395 कोडेन फॉस्फेटमिश्रीत कफ सिरप बॉटल्स, 305 हेरॉईन, 136 ग्रॅम कोकेन, 296 एमडी, 660 ग्रॅम गांजा आदी ड्रग्जचा साठा जप्त केला असून त्याची किंमत चार कोटी एक लाख रुपये इतकी आहे.
हेही वाचा – Maharashtra Winter Session 2024 : देशमुखांच्या हत्येचे भीषण वास्तव, सुरेश धस यांनी विधानसभेत काय सांगितले?
Edited by : Ashwini A. Bhatavdekar