घरताज्या घडामोडीमहापालिकेकडून विद्यार्थी, शिक्षकांसह पालकांना आपत्कालीन प्रशिक्षण

महापालिकेकडून विद्यार्थी, शिक्षकांसह पालकांना आपत्कालीन प्रशिक्षण

Subscribe

शाळेत, घरी, कार्यालयात अथवा अन्यत्र कुठेही एखादी दुर्घटना घडल्यास शालेय शिक्षक, विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सदर आपत्तीला घाबरून न जाता, सैरावैरा धावपळ न करता डोकं शांत ठेवून पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष यांना आपत्तीबाबत कळवून मदत मागणे.

मुंबई : घरात, कार्यालयात, इमारतीमध्ये, शाळेत आग लागल्यास, इमारत, घराचा भाग कोसळल्यास, समुद्र, नदीत बुडत असताना आपण आपले, आपल्या कुटुंबियांचे व इतरांचे संरक्षण कसे करावे याबाबतचे प्रात्यक्षिकासह सखोल माहितीपूर्ण प्रशिक्षण मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे तज्ज्ञ अधिकारी राजेंद्र लोखंडे व त्यांचे सहकारी यांनी शुक्रवारी घाटकोपर (पूर्व) येथील वनिता विकास शाळेतील २०० विद्यार्थी, ७० पालक व मुख्याध्यापिकांसह १५ शिक्षकांना दिले. (Emergency training for students teachers and parents from the Municipal Corporation)

मुंबईसारख्या शहरात दररोज कुठे ना कुठे आग लागणे, समुद्र, नदीत पडून बुडणे, गॅस गळती, रासायनिक वायू गळतीमुळे दुर्घटना घडून जिवीत हानी होणे, वादळ, भूकंप आदी विविध आपत्कालीन घटना घडत असतात. अशा घटनांप्रसंगी सर्वसामान्य व्यक्ती, महिला, शालेय विद्यार्थी, वृद्ध आदी घाबरून जातात, गोंधळतात. त्यांना आपला जीव वाचविण्यासाठी नेमके काय करावे याबाबत प्रशिक्षण नसते, अभ्यासपूर्ण माहिती नसते. त्यामुळे शालेय शिक्षक, विद्यार्थी व त्यांचे पालक यांना आपत्कालीन प्रशिक्षण देण्यात यावे, अशी विनंती शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा सुभेदार यांनी मुंबई महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या प्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. त्यानुसार, आपत्कालीन विभागाचे तज्ज्ञ अधिकारी राजेंद्र लोखंडे यांनी शालेय शिक्षक, विद्यार्थी व त्यांच्या पालकांना आपत्कालीन प्रशिक्षण दिले.

- Advertisement -

या प्रशिक्षणासाठी आपत्कालीन नियंत्रण कक्ष चालक भरतकुमार फुणगे व महेंद्र खांबाळेकर यांनी मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षिका शुभांगी वालावलकर यांनी केले. यावेळी, वनिता विकास शालेय संस्थेच्या सेक्रेटरी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वैशाली किशोर रानडे, शाळेच्या माजी मुख्याध्यापिका मृणालिनी मोहन जोगळेकर, शिक्षिका रंजना पवार, राणे मॅडम आदी शिक्षिकांसह कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

प्रशिक्षण व प्रात्यक्षिक

- Advertisement -

शाळेत, घरी, कार्यालयात अथवा अन्यत्र कुठेही एखादी दुर्घटना घडल्यास शालेय शिक्षक, विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सदर आपत्तीला घाबरून न जाता, सैरावैरा धावपळ न करता डोकं शांत ठेवून पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष यांना आपत्तीबाबत कळवून मदत मागणे. तसेच, संबंधित पोलीस, अग्निशमन दलाकडून मदत येईपर्यंत सुरक्षित मार्ग काढणे व स्वतःचा आणि कुटुंबियांसह इतरांचा जीव वाचविणे आवश्यक असल्याचे आपत्कालीन व्यवस्थापन विभागाचे तज्ज्ञ प्रशिक्षक राजेंद्र लोखंडे यांनी सांगितले.

एखाद्या दुर्घटनेत हाताला, पायाला मार लागल्याने जखमी झालेल्या व्यक्तीला हाताच्या घडीचा वापर करून अलगद उपचारासाठी दवाखान्यात, रुग्णालयात कसे घेऊन जायचे, दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला घरातील चादर, बांबू यांच्या साहाय्याने तात्पुरती स्ट्रेचर बनवून व्यवस्थितपणे रुग्णालयात कसे घेऊन जायचे याबाबतचे मार्गदर्शन करताना राजेंद्र लोखंडे यांनी, विद्यार्थ्यांसह पालकांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. त्याचप्रमाणे, भूकंप झाल्यास स्वतःसह कुटुंबियांची काळजी कशी घ्यावी, समुद्रात, नदीत अथवा पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, रिकामा हंडा यांचा वापर करून पोहत पोहत सुरक्षित ठिकाण कसे गाठायचे, आग लागल्यास अग्निरोधक यंत्राचा वापर कसा करायचा व आग कशी विझवायची याबाबतही सखोल मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आली.

दुर्घटना घडल्यास मदतीसाठी आपत्कालीन यंत्रणेची मदत आवश्यक : राजेंद्र लोखंडे

आपत्कालीन घटना घडल्यास पोलीस, अग्निशमन दल, पालिका आपत्कालीन नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका यांना तात्काळ संपर्क करून त्यांची मदत घेणे. गॅस गळती झाल्यास संबंधित यंत्रणेकडे तात्काळ संपर्क करणे. त्यासाठी आपत्कालीन संबंधित यंत्रणेचे संपर्क क्रमांक एका कार्डपेपरवर लिहून ते घरात, कार्यालयात, शाळेत दर्शनीय ठिकाणी लावणे, आवश्यक असल्याचे राजेंद्र लोखंडे यांनी सांगितले.


हेही वाचा – काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणतात, भाजपा आणि आरएसएस माझे गुरू… त्यांना धन्यवाद!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -