घरमुंबईसरकारी जमिनीवर अतिक्रमणामुळे जि. प. सदस्याचे पद धोक्यात

सरकारी जमिनीवर अतिक्रमणामुळे जि. प. सदस्याचे पद धोक्यात

Subscribe

ठाणे जिल्हा परिषदेच्या कारीवली गटातून निवडून आलेले शिवसेनेचे सदस्य गोकुळ कचेर नाईक यांनी पत्नी उषा नाईक यांना पुढे करून शासकीय गुरचरण जागेवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य गोकुळ नाईक यांचे सदस्यपद रद्द करण्यात यावे, अशी मागणी समाजसेवक संजय परशुराम नाईक यांनी कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. कारिवली ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाचा पर्दाफाश झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून या अतिक्रमणाची महसूल विभागाकडून चौकशी सुरु झाल्याने विद्यमान जि. प. सदस्य गोकुळ नाईक यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे.

सार्वत्रिक निवडणूकीत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी शासकीय गुरचरण जमिनीवर अतिक्रमण केल्यास संबंधित लोकप्रतिनिधींचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, असे राज्य शासनाचे आदेश असून राज्यभर या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होत आहे. सरकारी जमिनीवरील अतिक्रमणासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने देखील मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. असे असताना शासकीय आदेशाला बगल देत काही लोकप्रतिनिधी आपल्या पदाचा गैरवापर वापर करून शासकीय गुरचरण जागेवर अतिक्रमण करून शासकीय जागा हडपण्याचा प्रकार राजरोसपणे करतांना दिसत आहे. जि. प. सदस्य गोकुळ नाईक हे वर्षभरापूर्वी झालेल्या ठाणे जिल्हापरिषद निवडणूकीत कारीवली गटातून निवडून आले आहेत.

- Advertisement -

मात्र त्यांनी त्यांच्या धर्मपत्नी उषा गोकुळ नाईक यांच्या नावे मौजे कारीवली येथील सरकारी जमीन सर्व्हे नं.१६४ / १ पैकी या शासकीय जागेवर अतिक्रमण करून सुमारे १० गुंठे जागा हडप करून या जागेवर दुकान तसेच व्यापारी गाळ्यांचे बांधकाम केले आहे. तसेच त्यांचे भाऊ नीलम नाईक यांच्या नावेदेखील शासकीय गुरचरण जागेवर अतिक्रमण केले आहे.शासकीय गुरचरण जागेवर अतिक्रमण करणार्‍या नागरिकांच्या यादीत देखील गोकुळ नाईक यांच्या पत्नी उषा नाईक यांची नोंद आहे, असेही संजय नाईक यांनी कोकण आयुक्तांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे शासकीय आदेशानुसार जि. प. सदस्य गोकुळ नाईक यांचे सदस्यपद रद्द करण्याची मागणी समाजसेवक संजय नाईक यांनी केली आहे. संजय नाईक यांच्या तक्रारीनंतर कारिवली ग्रामपंचायत हद्दीतील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करणार्‍या भूमाफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -