Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मुंबईत प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईला पुन्हा वेग

मुंबईत प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाईला पुन्हा वेग

Subscribe

मुंबईत १ मार्चपासून बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्यांविरोधात महापालिकेच्या पथकाने धडक कारवाईची मोहिम हाती घेतली. त्यानुसार दिवसभरात १ हजार २८ किलोचा प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

मुंबईत १ मार्चपासून बंदी घालण्यात आलेल्या प्लास्टिक पिशव्यांविरोधात महापालिकेच्या पथकाने धडक कारवाईची मोहिम हाती घेतली. त्यानुसार सोमवारी झालेल्या कारवाईत दिवसभरात १ हजार २८ किलोचा प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे आता नागरिकांकडील प्लास्टिक पिशव्याही जप्त केल्या जाणार आहे. मात्र, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा दंड वसूल केला जाणार नाही. ही मोहिम मंगळवार श्रीसिध्दीविनायक मंदिर परिसरात करून भाविकांकडून प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात येणार आहे.

दुकानांसह फेरीवाले आणि नागरिकांकडील पिशव्या जप्त

विशेष म्हणजे या कारवाईमध्ये विभाग कार्यालयांच्यावतीने फेरीवाल्यांकडील प्लास्टिक पिशव्या जप्त करून कारवाई करण्यात येत असून नागरिकांकडूनही पिशव्या जप्त केल्या जात आहेत. मुंबईत येत्या २० मेपासून प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार करत महापालिकेने १ मार्चपासून याबाबतची धडक कारवाई हाती घेतली. महापालिकेच्या परवाना, बाजार आणि दुकान व आस्थापना विभागाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या पथकामार्फत प्लास्टिक पिशव्यांविरेाधातील कारवाई हाती घेतली आहे. सोमवारी झालेल्या या कारवाईत दुकान व आस्थापने विभागाच्या पथकाने १ हजार ३२५ आणि परवाना विभागाच्या पथकाने २ हजार ७५६ ठिकाणी भेटी देऊन तपासणी केली. या तपासणीमध्ये अनुक्रमे ५७५ किलो आणि ४५२ किलो याप्रकारे एकूण १ हजार २८ किलो प्लास्टिकचा साठा जप्त केला. यामध्ये महापालिकेच्या बी विभाग कार्यालयाच्या हद्दीतील मस्जिद बंदर,अब्दुल रेहमान स्विट आदी परिसरातूनच तब्बल ७५१ किलोच्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे. दुकान व आस्थापना विभागाच्या पथकाने १ लाख रुपये तर परवाना विभागाच्या पथकाने २ लाख ७५ हजार याप्रमाणे ३ लाख ७५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

दादरमध्ये जोरदार कारवाई

- Advertisement -

दादर रेल्वे स्थानकाजवळील फेरीवाल्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रास केला जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या जी/उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त किरण दिघावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने फेरीवाल्यांवरील कारवाई कडक करतानाच त्यांच्याकडील प्लास्टिक पिशव्याही जप्त केल्या. याबरोबरच दादर रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांकडून वापरल्या जाणार्‍या प्लास्टिक पिशव्याही जप्त करण्यात आल्या आहेत. नागरिकांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या जात असल्या तरी त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा दंड आकारला जात नाही. नागरिकांकडून पिशवी जप्त करतानाच त्यांना अशाप्रकारच्या पिशवीचा वापर न करण्याबाबत समज दिली जात आहे.

सिध्दीविनायक मंदिरात जाताना प्लास्टिक पिशवी टाळा

दादरमधील फेरीवाल्यांकडून तसेच नागरिकांकडून प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्यानंतर मंगळवारी प्रभादेवीतील श्री सिध्दीविनायक मंदिराकडे जी/उत्तर विभागातील परवाना आणि दुकान-आस्थापना विभागाच्या पथकाने लक्ष वेधला आहे. मंदिरात जाताना अनेक भाविक प्लास्टिक पिशव्यांमधून हार-फुले घेऊन जात असतात. त्यामुळे भाविकांकडील या सर्व पिशव्या जप्त करून त्यांच्यामध्ये बंदी घालण्यात आलेल्या पिशव्यांबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले. तसेच बुधवारी माहिम चर्चमध्ये येणार्‍या भाविकांकडूनही अशाप्रकारे प्लास्टिक पिशव्या जप्त करून त्याठिकाणीही प्लास्टिक पिशव्यांबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


- Advertisement -

हेही वाचा – पाच वर्षात १४ हजार ५९१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या 


 

- Advertisment -