मुंबई : लोकांना रडवणे सोपे असते पण हसवणे फार कठीण असते, असं म्हणतात. त्यामुळेच छोट्या पडद्यावरील हसवण्याचे सगळेच कार्यक्रम लोकप्रिय होतात. असाच एक कार्यक्रम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’. हा कार्यक्रम त्यातील विनोदांमुळे जेवढा लोकप्रिय झाला तेवढाच तो त्याचे सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे यांच्या खुमासदार सूत्रसंचालनामुळे चालतो. मात्र, आता या कार्यक्रमाचे सबकुछ निलेश साबळेच हा शो सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मध्यंतरी हा कार्यक्रमच संपणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर हा कार्यक्रम पुन्हा सुरु झाला. मात्र आता प्रेक्षकांवर याची पूर्वीइतकी पकड राहिलेली नाही. त्यातच निलेश साबळे हा कार्यक्रम सोडणार असतील, तर याचाही फटका या कार्यक्रमाला बसणार आहे. लवकरच या शोमधील कलाकार कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे हे एका नव्या हिंदी शोमध्ये एंट्री घेणार आहेत. या शोचे प्रोमो समोर आले असून त्यात कुशल बद्रिके दिसतो आहे. त्यानंतरच हे दोघेही शो सोडणार असल्याची चर्चा रंगली होती.
तब्येतीच्या कारणामुळे राहणार लांब
या कार्यक्रमाचा होस्ट, लेखक निलेश साबळेच हा शो सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. निलेशने नुकतीच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली, त्यात हा खुलासा केला आहे. याविषयी निलेश साबळे म्हणाले, “चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम मी सोडला असल्याची चर्चा आहे. वाहिनीने ठरवलं तर कार्यक्रम पुन्हा सुरू होऊ शकतो. पण तब्येतीच्या कारणाने मी थोडेदिवस मी कार्यक्रमातून बाहेर असेल.’’ अशी माहिती दिली आहे. निलेश साबळेने चला हवा येऊ द्या मध्ये लेखक, दिग्दर्शक आणि कलाकार अशा सगळ्या भूमिका निभावल्या. चित्रपट आणि मालिकांच्या आगळ्या स्क्रिप्ट तयार करत कलाकारांसहित प्रेक्षकांना हसवलं.
हेही वाचा – HSC Exam 2024 : बीडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा प्रकार उघडकीस; वाचा सविस्तर
‘चला हवा येऊ द्या’ हा फक्त एका भागासाठी सुरू झालेला कार्यक्रम होता. पहिल्याच भागाला प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून हा कार्यक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय वाहिनीने घेतला. गेली 10 वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. निलेश साबळे याने या कार्यक्रमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं. तर भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, अंकुर वाढवे आणि सागर कारंडे या सगळ्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांना खळखळून हसवलं.