कल्याण डोंबिवलीत पहाटे ५ ते २ वाजेपर्यंतच मिळणार जीवनावश्यक वस्तू

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पालिका आयुक्तांचे आदेश

कल्याण डोंबिवलीतील जीवनावश्यक वस्तू मिळणार पहाटे ५ ते २ पर्यंतच

कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कल्याण डोंबिवलीमध्ये वाढत असून या रुग्णांची संख्या ४३ झाली आहे. असे असतांना देखील नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाने विविध ठिकाणी गर्दी करत आहेत. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने पहाटे ५ ते दुपारी २ पर्यंतच सुरु राहणार असून त्यातून मेडिकल आणि दवाखाने वगळण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

गर्दी रोखण्यासाठी आयुक्तांचा निर्णय 

याआधी पालिका आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार ७ एप्रिल पासून संध्याकाळी ५ वाजल्यापासून ते पहाटे ५ वाजेपर्यंत ही दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि नागरिकांची होणारी गर्दी हे लक्षात घेता शुक्रवारपासून दररोज दुपारी २ ते पहाटे ५ वाजेपर्यंत मेडिकल, रुग्‍णालये वगळता सर्व जीवनावश्‍यक वस्‍तू किराणा दुकाने, भाजीपाला सर्व दुकाने बंद ठेवण्‍याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे.

मेडिकल, रुग्‍णालये वगळता इतर संबंधित व्‍यावसायिक आस्‍थापना/दुकाने यांचे मालक किंवा संबंधितांनी सदर आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास कलम १८८ नुसार कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.


Corona: ठाणेकरांना जीवनावश्यक वस्तू मिळणार घरपोच!