भाजपलाही हरवता येऊ शकते, कर्नाटकने दिला देशाला संदेश – शरद पवार

Sharad-Pawar

मुबई : कर्नाटकने देशाला एक संदेश दिला आहे की भाजपला हरवता येऊ शकते. राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची एकत्रित मोट बांधण्याची गरज असल्याचे शरद पवार म्हणाले. डाव्या आघाडीचे डी राजा यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यानंतर पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.

शरद पवार म्हणाले की, कर्नाटकसारखी परिस्थिती इतर राज्यात निर्माण होऊ शकते यासाठी मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. अनेक राज्यात सिंगल पक्ष आहेत, त्यामुळे काँग्रेसने कर्नाटकमध्ये शक्ती दाखवून भाजपविरोधात जिंकली त्याचप्रमाणे इतर राज्यात किमान समान कार्यक्रम घेऊन जनतेत जाणार असल्याची माहिती देखील शरद पवार यांनी दिली. कर्नाटकमध्ये भाजपाचा पराभव झाल्यामुळे राष्ट्रीय पातळीवर पराभव करता येऊ शकतो, यासाठी विरोधकांची एकत्रित मोठ बांधण्याची गरज आहे, यासाठी शरद पवार यांनी निर्धार केला आहे. आज संध्याकाळी शरद पवार यांच्या सिल्वर ओकवर महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, भाई जगताप, अशोक चव्हाण या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. यानंतर डाव्या आघाडीचे डी राजा यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

जयंत पाटील म्हणाले की, कर्नाटकमध्ये नुकत्याच ज्या निवडणूका झाल्या त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रचंड मोठा पराभव झाला आहे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकांसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख एकत्रित बसून हळूहळू लोकसभेच्या आणि विधानसभेच्या जागांच्या वाटपाबाबत चर्चा करणार आहोत. तिन्ही पक्षासोब महाराष्ट्रातील काही इतर पक्ष आणि आमचे आघाडीचे घटक पक्ष या बैठकीत सहभागी होतील. एकत्रितपणाने महाविकास आघाडीचा अधिक चांगला समन्वय महाराष्ट्रातल्या जनतेपुढे ठेवून एक ठाम पर्याय महाराष्ट्रातल्या जनतेला सक्षमपणाने देण्याचा प्रयत्नाच्या निर्णयावर या बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व नेत्यांचे एकमत झाले आहे. त्यामुळे मला खात्री आहे की, महाविकास आघाडी कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातदेखील महाराष्ट्रातल्या जनतेच्या विश्वासास पात्र ठरून अधिक मोठ्या संख्येने ताकदीने पुढच्या काळात काम करेल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.