भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री कोरोना पॉझिटिव्ह!

bjp
भाजप

डोंबिवली भाजपचे माजी खासदार आणि युतीच्या काळात राज्याचे मंत्री असलेले ज्येष्ठ नेते हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील भाजपमध्ये खळबळ माजली आहे. हे नेते मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना युती सरकारच्या काळात राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री होते. तसेच ते ठाणे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणूनही निवडून आले होते. कल्याण विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून सातत्याने निवडून येत असत.

त्यांचा Covid-19 तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना कल्याणमधील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले आहे. हे नेते डोंबिवली पूर्व परिसरात राहतात. त्याचं वय ७५हून जास्त असल्यामुळे ते कोरोनासाठी संवेदनशील (व्हल्नरेबल) वयोगटात मोडतात. त्यांना शुक्रवारी काही लक्षणं जाणवू लागल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे. विशेषत: कल्याण पूर्व आणि डोंबिवलीत ही रुग्णसंख्या वाढते आहे. आजघडीला कल्याण-डोंबिवली मनपाच्या हद्दीत रुग्णसंख्या २५१४वर पोहोचली असून ४७ जणांचा मृत्यू झाला आहे.