Eco friendly bappa Competition
घर मुंबई येत्या १७ जानेवारीपासून महालक्ष्मी सरस

येत्या १७ जानेवारीपासून महालक्ष्मी सरस

Subscribe

या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील तसेच २९ राज्यातील स्वयंसहाय्यता गट व ग्रामीण कारागीर सहभागी होणार आहेत.

उभ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या महालक्ष्मी सरस प्रदर्शन येत्या १७ जानेवारीपासून मुंबईत सुरु होत आहेत. वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानात होणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते होणार आहे. तर २९ जानेवारीपर्यंत हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील तसेच २९ राज्यातील स्वयंसहाय्यता गट व ग्रामीण कारागीर सहभागी होणार आहेत. ज्यात एकूण ५११ स्टॉल असणार असून त्यापैकी ७० स्टॉल हे खाद्यपदार्थांचे असणार आहेत.

महारालक्ष्मी सरस प्रदर्शन हे एक अत्यंत नाविण्यपूर्ण, लक्षवेधी, व ग्रामीण संस्कृतीला शहरापर्यंत पोहचविण्याचे अनोखे व्यासपीठ मानले जाते. या प्रदर्शनात ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू, ग्रामीण भागातील खाद्य पदार्थ या प्रदर्शनात उपलब्ध होणार आहेत. यामध्ये जळगावचे भरीत, खानदेशचे मांडे, कोकणातील मच्छी व तांदळाची भाकरी, कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा, सोलापुरची शेंगाचटणी, राज्यातील विविध भागातील मसाले, हातसडीचा तांदुळ इत्यादी बाबी उपलब्ध होणार आहेत.

दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम

- Advertisement -

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी वरील घोषणा केली. महारालक्ष्मी सरस प्रदर्शनात दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम असतील. जास्तीत जास्त नागरीकांनी प्रदर्शनास भेट देऊन जास्तीत जास्त खरेदी करावी व गावांमधून आलेल्या महिलांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन त्यांनी केले.

मागील वर्षी १२ कोटी रुपयांची उलाढाल

महालक्ष्मी सरसच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल स्वयंसहाय्यता गट दरवर्षी करत असतात. मागील दीड दशकात महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून अंदाजे ८ हजार स्वयंसहाय्यता समुहाने मुंबईकरांना सेवा दिली आहे. पहिल्यावर्षी ५० लाखाची आर्थिक उलाढाल झाली होती. तर मागील वर्षी जवळपास १२ कोटी रुपयांच्या आर्थिक उलाढालीचा टप्पा या प्रदर्शनाने गाठला, अशी माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

प्रत्येक गावाला दर्जेदार रस्ता

- Advertisement -

यावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले की, “ग्रामीण भागात जवळपास २ लाख ३६ हजार रस्ते आहेत. या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. यापुढील काळात प्रत्येक गावाला जोडणारा रस्ता दर्जेदार असावा, ही आमची प्राथमिकता असेल. प्राथमिक शाळा तसेच आरोग्य केंद्रे यांना सुविधा उपलब्ध करुन देण्यावरही भर देण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.

तर मग गावात थेट सरपंच निवडीची पद्धती का?

सरपंचांच्या थेट निवडीबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, “सरपंचांच्या थेट निवडीमुळे त्याचा विपरीत परिणाम दिसून आला आहे. सरपंच एका विचाराचे व सदस्य दुसऱ्या विचाराचे असे चित्र अनेक ग्रामपंचायतींमध्ये निर्माण झाले आहे. थेट निवडून आलेले सरपंच व सदस्य यांच्यामध्ये समन्वय राहिलेला नाही. याचा गावाच्या विकास कामावर परिणाम झाला आहे. आपल्या देशात अध्यक्षीय पद्धती नाही, तर मग गावात थेट सरपंच निवडीची पद्धती का? असा प्रश्न मी उपस्थित केला होता,” असे ते म्हणाले.

हेही वाचा – सीताराम कुंटे झाले मुख्यमंत्र्यांचे शेजारी

- Advertisment -