घरताज्या घडामोडीसेव्हन हिल्समधील कोरोना उपचारांसाठी राबणाऱ्या यंत्रणेवर ११९ कोटींचा खर्च

सेव्हन हिल्समधील कोरोना उपचारांसाठी राबणाऱ्या यंत्रणेवर ११९ कोटींचा खर्च

Subscribe

पालिकेने या रुग्णालयात गेल्या मार्च ते डिसेंबर २०२० या कालावधीत तब्बल ११९ कोटी रुपये खर्च केला आहे.

मुंबई महापालिकेच्या मरोळ येथील कॅन्सरसाठी नियोजित असलेल्या जागेवर खासगी सहभागामधून उभारण्यात आलेल्या सेव्हन हिल्स या रुग्णालयात सध्या कोरोना बाधित रुग्णांवर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत. पालिकेने या रुग्णालयात गेल्या मार्च ते डिसेंबर २०२० या कालावधीत तब्बल ११९ कोटी रुपये खर्च केला आहे. दरमहा किमान ७ कोटी रुपये याप्रमाणे ७० कोटी रुपये आणि अतिरिक्त ४९ कोटी रुपये असे एकूण ११९ कोटी रुपये इतका खर्च कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारावर करण्यात आला आहे. मरोळ येथील पालिकेच्या जागेवर कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी काही कोटी रुपये खर्च करून रुग्णालय उभारण्याचे नियोजित केले होते. मात्र काही कारणास्तव ते बारगळले. रुग्णालय न उभे राहिल्याने जागा पडून राहिली. अखेर पालिकेने २००४ ला सेव्हन हिल्स संस्थेसोबत सामंजस्य करार करून ६६६८७.९० चौ. मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर १३०० बेडचे कॅन्सर रुग्णांसाठी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला. या संस्थेने २०% बेड पालिकेच्या सामान्य रुग्णांसाठी पालिकेच्या दरात वैद्यकीय सेवा देणे बंधनकारक करण्यात आले होते.मात्र सेव्हन हिल्सने या कराराची पूर्तता केली नाही. २०१३ मध्ये केवळ ३०६ बेडचे रुग्णालय सुरू केले. तसेच, वित्तीय संस्थांकडून कोट्यवधीचे कर्ज घेतले. त्यातच पालिकेचे व सेव्हन हिल्स यांच्यातील संबंध विकोपाला गेले.

पालिकेच्या कराराची अंमलबजावणी न केल्याने रुग्णालय डबघाईला आले होते. पालिकेने हे रुग्णालय ताब्यात घेण्यासाठी कार्यवाहीही सुरू केली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी पालिकेने खांद्यावर घेतली. पालिकेने ३०६ बेडऐवजी बेडची एकूण क्षमता १५०० पर्यंत नेली. यामध्ये , ३०० बेड हे अतिदक्षता विभागासाठी करण्यात आले.

- Advertisement -

गेल्या मार्च ते डिसेंबर २०२० या कालावधीत पालिकेने रुग्णालयात डॉक्टर, कर्मचारी यांच्या वेतनावर २.५ कोटी रुपये, रुग्णालय प्रचालनावर ( खान – पान, अभियांत्रिकी, सुरक्षा , हाऊसकिपिंग, पेशंट केअर इत्यादी) १.५ कोटी रुपये, प्रशासकीय खर्चावर ( औषधे, साहित्ये,संरक्षक व इतर साधने, पाणी, वीज, फोन, केबल, इंटरनेट, मेडिकल गॅस इत्यादी) ३.५ कोटी रुपये, वैधानिक दायित्व, टीडीएस, पीएफ, पीटी, जीएसटी इत्यादीवर १ कोटी रुपये असे एकूण ८.५ कोटी रुपये दरमहा खर्च असताना पालिकेने दरमहा ७ कोटी रुपये याप्रमाणे ७० कोटी रुपये खर्च केले.
तसेच, अतिरिक्त खर्च म्हणून ४८.९६ कोटी रुपये खर्च केले.

त्याचप्रमाणे पालिकेने मार्च ते डिसेंबर २०२० या कालावधीत कोरोना बाधित एकूण १७,८१३ रुग्णांना दाखल करून घेत त्यांच्यावर उपचार केले. त्यापैकी १५,९१० रुग्ण बरे झाल्याने त्यांना त्या त्या वेळी घरी पाठविण्यात आले.
अद्यापही या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर युद्धपातळीवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – होम क्वारंटाईन असल्याने चिंतेत आहात? या नंबरवर कॉल करा चिंता, दूर करा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -