घरताज्या घडामोडीकोरोना काळात उद्यानांच्या कंत्राटदारांना फुटली पालवी

कोरोना काळात उद्यानांच्या कंत्राटदारांना फुटली पालवी

Subscribe

उद्यानांची देखभाल न करताही २२ कोटी रुपयांची खैरात

कोरोनाच्या काळात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये मुंबईतील सर्व उद्याने, मनोरंजन मैदाने, बगीचे, क्रिडांगणे आदी बंद स्थितीत असतानाच याच कालावधीत त्यांच्या देखभालीवर तब्बल २२ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली. मुंबईतील या उद्यान व मैदानांच्या देखभाल व दुरुस्तीवर हे २२ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून विद्यमान कंत्राटदारांचा कालावधी संपुष्टात येऊनही त्यांना वाढीव कामांच्या रुपात ही रक्कम आंदण दिली जात आहे. त्यामुळे न केलेल्या कामांसाठी ही रक्कम दिली जात असल्याने कोरोना काळात त्या कंत्राटदारांना पालवी फुटल्याचे दिसून येत आहे.

मुंबईतील २४ विभागांतील उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, मोकळ्या जागा, रस्ता दुभाजक, वाहतूक बेटे इत्यादी जागेचा विकास व देखभालीसाठी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. जानेवारी २०१७ रोजी २४ विभागांसाठी स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली. या तीन वर्षांसाठी १८० कोटी ६८ लाख रुपयांचे कंत्राट मंजूर करण्यात आले होते. हा कालावधी ३१ मार्च २०२० रोजी संपुष्टात आला. मात्र, या कंत्राटदारांशी उद्यान विभागांच्या अधिकार्‍यांशी साटेलोटे असल्याने त्यांनी याची निविदा काढण्यास विलंब केला. परिणामी कोरोना काळात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे पुढील निविदा प्रक्रिया थांबवण्यात आली. त्यामुळे जुन्याच कंत्राटदारांकडून पुढील कामे करून घेण्यात आली.

- Advertisement -

विशेष म्हणजे २३ मार्च पासून सप्टेंबर २०२० पर्यंत मुंबईतील उद्याने व मैदाने ही नागरिकांसाठी बंद ठेवण्यात आली होती. या उद्यान व मैदानांमध्ये कोणालाही प्रवेश नव्हता. परंतु याच लॉकडाऊनच्या काळात मैदान व उद्यानांसह वाहतूक बेटांवर २१ कोटी १४ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. महापालिकेने या कंत्राटदारांना १८० कोटी ६८ लाख रुपयांचे कंत्राट दिलेले असताना त्याच कंत्राटदारांना सहा महिन्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला. त्यामुळे या वाढीव कालावधीत २१ कोटी १४ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून कंत्राटदारांना ही वाढीव रक्कम देण्यासाठी स्थायी समितीपुढे प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

महापालिकेने या निविदा संपुष्टात येण्यापूर्वी डिसेंबर महिन्यात काढल्या असत्या तर जुन्या कंत्राटदारांचा कालावधी संपल्यानंतर त्या जागी नवीन कंत्राटदारांची निवड करता आली असती. परंतु उद्यान विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक अशाप्रकारे निविदेला विलंब करत कंत्राटदारांना वाढीव कामे देण्याचा घाट घालत असतात. अधिकार्‍यांच्या या निष्काळजीपणामुळेच निविदा न काढताच सुमारे २२ कोटी रुपयांचे वाढीव कामे देण्याची वेळ आली. विशेष म्हणजे लॉकडाऊनच्या काळात एकाही उद्यान व मैदानांची देखभाल केलेली नसतानाही कंत्राटदारांना ही एकप्रकारे कोरेानाची भेटच महापालिकेने दिली आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, या निविदेतील दर हे तीन वर्षांपूर्वीचे आहेत. त्यामुळे सध्या जरी त्यांना वाढीव काम दिले असले तरी त्यामध्ये महापालिकेचे नुकसान झालेले नाही. कदाचित नविन निविदा काढली असती तर त्यामध्ये हे दर अधिक दिसून आले असते. तसेच लॉकडाऊनच्या काळात उद्यान व मैदानांचा विकास झाला नाही असे म्हणणे वावगे ठरेल,असे त्यांचे म्हणणे आहे. जरी उद्यान व मैदान हे बंद असली तरी त्यातील झाडांची दैनंदिन निगा राखणे आवश्यक होते. त्याप्रमाणे तिथे राहत असलेले माळी कम सुरक्षा रक्षक हे उद्यानांची काळजी घेत होती. अपवादात्मक एखादे उद्यान असू शकेल; पण सरसकट सर्वच उद्यान व मैदानांचा विकास झाला नाही, असेही म्हणता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -