घरमुंबईतज्ज्ञ संचालक फ्रान्सिस डिकॉस्टा यांचा राजीनामा

तज्ज्ञ संचालक फ्रान्सिस डिकॉस्टा यांचा राजीनामा

Subscribe

बॅसिन कॅथॉलिक बँकेचे तज्ज्ञ संचालक फ्रान्सिस डिकॉस्टा यांनी शनिवारी रात्री अचानक ’आपल्याला तज्ज्ञ संचालक म्हणून राहायचे नाही’ असे राजीनामा पत्र बँकेच्या अध्यक्षांना सुपूर्द केल्याने एकच खळबळ उडाली. मागील अनेक वर्षांपासून बँक या न त्या कारणासाठी चर्चेत राहिली आहे. मात्र डिकॉस्टासारख्या अनुभवी बँकरने तडफातडफी राजीनामापत्र लिहिल्यामुळे बँकेत काही आर्थिक घोटाळा तर नाही ना अशी चर्चा सुरु झाली आहे. डिकॉस्टा यांचे राजीनामापत्रात जरी वैयक्तिक कारण दिले असले तरी बँकेत सध्या सुरु असलेल्या ’चिश्तिया फिशरीज प्रकरण’ कारणीभूत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अनुभवी बँकर म्हणून डिकॉस्टा भारतभर परिचित आहेत. रिझर्व बँकच्या विविध धोरणांचा व नियमांचा त्यांना अभ्यास आहे. सेंच्युरियन बँकेचे ते भारत देशाचे प्रमुख होते. त्या अगोदर त्यांनी भारतीय स्टेट बँकेत 20 वर्ष विविध पदांवर कार्य केले आहे. तसेच रिलायन्स कॅपिटलमध्ये ते उच्च पदावरून सेवा निवृत्त झाले आहेत. शिस्तबद्ध तसेच विविध धोरण व नियम पालन करून बँक शिस्तबद्ध प्रकारे चालवण्यासाठी आजही ते अनेकांना मार्गदर्शन करीत आहेत.

- Advertisement -

डिकॉस्टा यांनी राजीनामापत्रात वैयक्तिक कारण दिले असले तरी त्यामागे चिश्तिया फिशरीज प्रकरण कारणीभूत असल्याचे माहितगार सांगतात. भाईंदर येथील व्यवसायिक मुनीर अब्दुल रहेमान शेख हे चिश्तिया फिशरीजचे मालक आहेत. शेख यांनी बँकेकडून कर्ज घेताना आपली जमीन गहाण ठेवली होती. पुढे कर्ज फेडू न शकल्याने बँकेने ती विकून थकीत कर्ज वसूल करण्याचे ठरवले. बँकेच्या व्यवस्थापनामधील एका उच्च पदाधिकार्‍याने राजीव मिश्रा नामक इसमाची शेख यांची भेट घडवून जमीन मिश्रा यांना विकण्यास सांगितले. त्या अनुषंगाने बँकेने मुख्य कार्यालयात शेख व मिश्रा यांच्यात सामंजस्य करार बनवून थकीत कर्ज वसूल केले. मात्र त्याची पूर्ण परत फेड न झाल्याने बँकेने शेख यांना नोटीस बजावून उरलेली रक्कम भरण्यास सांगितले. याबाबत शेख यांनी बँकेत रीतसर पुरावे देत तक्रार दाखल केली. मात्र त्यावर कुठलीच कारवाई झाली नाही. उलट मिश्रा यांनी शेख यांना वकिलामार्फत नोटीस बजावून त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली असा दावा शेख यांनी केला आहे. यावर शेख यांनी आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार दाखल केली ज्यावर चौकशी सुरु आहे.

शेख यांनी दाखल केलेली तक्रार बँकेचे अध्यक्ष रायन फर्नांडिस यांनी गांभीर्याने घेतली. तज्ज्ञ संचालक डिकॉस्टा व अ‍ॅड. अल्बर्ट डाबरे यांच्यामार्फत चौकशी समिती नेमून अहवाल सादर करण्यास सांगितले. अहवालात जवळजवळ 5 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचे नमूद केल्याचे म्हटले जात आहे. तसेच ऑडीटबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अहवालात अनेक कागदपत्रांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे कळते. रितसर अहवाल असूनही कुठलीच कारवाई होत नसल्यानेच डिकॉस्टा यांनी हे पत्र लिहिल्याची चर्चा सर्वत्र पसरत आहे.

- Advertisement -

डिकॉस्टा यांनी काल पत्र दिले आहे. त्यांच्याशी याबाबत अजून चर्चा झाली नाही. राजीनाम्याचे नक्की कारण त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच कळेल, असे बँकेचे अध्यक्ष रायन फर्नांडिस यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -