घरताज्या घडामोडीआता नारळाचीही 'एक्सपायरी डेट'

आता नारळाचीही ‘एक्सपायरी डेट’

Subscribe

आता नारळाचीही 'एक्सपायरी डेट' असणार आहे. मात्र, यामुळे महिलांची चांगलीच गोची होणार आहे.

बाजारात खरेदी करण्यात येणाऱ्या बऱ्याच वस्तूंची एक ‘एक्सपायरी डेट’ असते. ती तारीख निघून गेल्यानंतर ती वस्तू किंवा एखाद उत्पादन खरेदी केले जात नाही. आतापर्यंत औषध, मेकअपचे सामान आणि दररोजच्या वापरण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थामध्ये तेल, बिस्कीट, चॉकलेट इत्यादी वस्तूंवर ‘एक्सपायरी डेट’ नमूद केलेली असते. मात्र, आता हीच ‘एक्सपायरी डेट’ नारळावर देखील छापून येण्यास सुरुवात झाली आहे आणि याचे कारण देखील तसेच खास आहे. परंतु, या नारळाच्या ‘एक्सपायरी डेट’मुळे महिलांची मात्र, चांगलीच गोची झाली आहे. सध्या सर्वच महिलांमध्ये नारळावर लावण्यात आलेल्या ‘एक्सपायरी डेट’ची चर्चा रंगली आहे.

- Advertisement -

बऱ्याचदा बाजारातून किंवा एखाद्या किराणा दुकानातून नारळ खरेदी करुन आणल्यास तो खराब निघाला तर त्याची बदली करुन दिली जाते. त्या खराब नारळाऐवजी चांगला नारळ देण्यात येतो. त्यामुळे ग्राहकांचे नुकसान होत नाही. मात्र, यात विक्रेत्याचे नुकसान होते. अनेकदा महिला हात गाडीवरुन नारळ खरेदी करतात. कारण त्या नारळाची किंमत देखील कमी असते. दुकानात विकल्या जाणाऱ्या एका नारळाची किंमत २५ रुपये असते. तर हातगाडीवर विक्री करणाऱ्या एका नारळाची किंमत १७ रुपये इतकी असते. त्यामुळे अनेक महिलावर्ग दुकानातून नारळ घेण्याऐवजी गाडीवरुन स्वस्तात नारळ खरेदी करतात. परंतु, त्या नारळाची कोणतीही ‘एक्सपायरी डेट’ नसते. तसेच बऱ्याचदा गाडीवर स्वस्तात विकणारे नारळ खराब निघतात. त्यामुळे ग्राहक ते नारळ दुकानात जाऊन तुमच्याकडून नारळ खरेदी केला आहे, असे सांगत नारळ बदलून घेतात. त्यामुळे दुकानदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे आता प्रभादेवी, परेल या परिसरातील नारळ विक्री करणाऱ्या दुकानदारांनी आपल्या नारळाची एक विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. काहींनी आपल्या नारळाला चिन्ह दिले आहे. तर काहींनी आपल्या दुकानाचे नाव आणि तारखेचा स्टॅम्प मारण्यास सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

एखाद्या ग्राहकांना खराब नारळ मिळाल्यास आम्ही तो नारळ बदलून देतो. मात्र, बऱ्याचदा असे निदर्शनास आले आहे की, तोच ग्राहक आमच्या दुकानातून आणि हातगाडीवरुनही नारळ खरेदी करतो. मात्र, हातगाडीवरुन घेऊन गेलेला नारळ फोडल्यानंतर खराब झालेला आढळल्यास तो आमच्या दुकानात येऊन बदली करुन देण्याची मागणी करतो. तसेच ग्राहकाला हा नारळ आमच्याकडून खरेदी केला नसल्याचे सांगितल्यास ग्राहक भांडण करण्यास सुरुवात करतो. त्यामुळे आम्हाला तो नारळ नाईलाजास्तव बदलून द्यावा लागतो. त्यामुळे हा वादविवाद न होण्यासाठी आम्ही आमच्या नारळाची ओळख तयार केली आहे. यावर दुकानाचे नाव आणि खरेदी करण्यात आलेली तारीख याचा स्टॅम्प मारण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे ही ‘एक्सपायरी डेट’ तीन दिवसांची देखील असणार आहे.  – ऐश्वर्या हुले; सान्वी स्टोअर्स – विक्रेत्या, प्रभादेवी

- Advertisement -

बऱ्याचदा महिलावर्ग असा प्रकार करतात. कारण हातगाडीवर स्वस्तात नारळ मिळतात आणि ते खरेदी केले जातात. परंतु, तो नारळ खराब निघाला तर हातगाडीवाला नारळ बदलून देत नाही. त्यामुळे ओळखीच्या नारळ विक्रेत्याला जाऊन हा नारळ तुमच्याकडूनच खरेदी केल्याची बतावणी करत तो नारळ बदलून घेतात.  – मेघा साखळकर; प्रभादेवी, ग्राहक


हेही वाचा – पालक मुलांना वेळ देऊ शकत नाही; हे वाचा


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -