माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी; शिस्तपालन समितीकडून कारवाई

ashish deshmukh
देशमुख म्हणाले की, शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर्श घेत आता मल्लिकार्जुन खर्गे यांनीही काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावे, असा मिश्किल सल्ला दिला आहे.

मुंबई : काँग्रेसचे माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस आशिष देशमुख यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांची सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री व शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी जारी केलेल्या पत्रात असे म्हटले की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने 5 मार्च 2023 रोजी पाठवलेल्या कारणे दाखवा नोटीसीला 9 एप्रिल रोजी उत्तर मिळाले व या उत्तरावर समितीने चर्चा केली. देशमुख यांंनी आपल्या पक्षविरोधी वर्तनाबद्दल व जाहीर वक्तव्याबद्ल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्वे या प्रकरणात लागू होतात. आशिष देशमुख यांनी केलेल्या पक्षविरोधी कारवायांची दखल घेऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून त्यांना सहा वर्षांच्या कालावधीसाठी निष्कासीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

काय आहे प्रकरण?
आठवड्याभरापूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आशिष देशमुख यांच्या नागपुरमधील निवासस्थानी दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला काटोल आणि सावनेर विधानसभा मतदारसंघातून प्रभावी उमेदवार हवा असल्याने फडणवीस आणि बावनकुळे याबाबतची चर्चा करण्यासाठी देशमुखांच्या घरी भेट घेण्यासाठी गेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आशिष देशमुख यांच्या घरी गेल्यामुळे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आणि नागपुरमध्ये अनिल देशमुख किंवा सुनील केदार यांच्याविरोधात भाजपा आशिष देशमुखांना उमेदवारी देऊ शकते, अशा चर्चा रंगू लागल्या. त्यामुळे या तिघांच्या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झाले असून या भेटीचे नेमके कारण काय? हे जाणून घेण्यासाठी सगळ्यांचे लक्ष लागलेले होते. पण या सर्व चर्चांना आशिष देशमुख यांनी थांबवल्या. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, फडणवीस आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. मी आजही काँग्रेसमध्ये आहे. मला दिलेल्या नोटीसचे सविस्तर उत्तर दिले आहे. मला खात्री आहे की मला काँग्रेस पक्ष काढणार नाही.