एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मुदतवाढ

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून या दोन्ही परीक्षांचे अर्ज व शुल्क भरण्यास १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

Paper leack in MPSC pre-exam Allegation of Abhavip
Paper leack in MPSC pre-exam Allegation of Abhavip

महाराष्ट्र्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२१ आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२१ या दोन्ही परीक्षांना अर्ज करण्यास तसेच शुल्क सादर करण्यास १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. संकेतस्थळात तांत्रिक बिघाड झाल्याने अर्ज भरण्यात येत असलेल्या अडचणींसंदर्भात विद्यार्थ्यांकडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन एमपीएससीने विद्यार्थ्यांना मुदतवाढ देत दिलासा दिला आहे.

महाराष्ट्र लोक सेवा आयोगामार्फत घेण्यात येणार्‍या महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेला अर्ज व शुल्क भरण्यासाठी १३ जानेवारी तर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२१ साठी अर्ज व शुल्क करण्यासाठी १५ जानेवारी अंतिम मुदत होती. संकेतस्थळावरील तांत्रिक बिघाडामुळे उमेदवारांना अर्ज करण्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी एमपीएससीकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून या दोन्ही परीक्षांचे अर्ज व शुल्क भरण्यास १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परीक्षा देऊ इच्छिणार्‍या उमेदवारांना १९ जानेवारीपर्यंत चलनाची सुधारित प्रत संकेतस्थळावरून घेता येणार आहे. बँकेमध्ये चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.