घरताज्या घडामोडीपालिकेत बायोमेट्रीक ऐवजी फेस रेकग्नाईज आधार व्हेरिफाईड अटेंडन्स सिस्टिम

पालिकेत बायोमेट्रीक ऐवजी फेस रेकग्नाईज आधार व्हेरिफाईड अटेंडन्स सिस्टिम

Subscribe

कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महापालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून "आधार व्हेरिफाईड अटेंडन्स सिस्टिम" अत्यंत उपयुक्‍त असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

मुंबईतील कोरोनाच्या वातावरणात पालिकेने विभाग कार्यलयात बायोमेट्रिक हजेरी घेण्याचे बंद केले. मात्र त्यावर उपाययोजना म्हणून पालिकेने कर्मचाऱ्यांची हजेरी नोंदविण्यासाठी “फेस रेकग्नाईज आधार व्हेरिफाईड अटेंडन्स सिस्टिम” चा पर्याय आणला आहे. या सिस्टीमचा वापर प्रायोगिक तत्वावर पालिकेच्या ग्रॅंट रोड,नाना चौक येथील ‘ डी’ वार्ड कार्यलयात आजपासून करण्यात आला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्तेही सिस्टीम आजपासून कार्यान्वित करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता महापालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून “आधार व्हेरिफाईड अटेंडन्स सिस्टिम” अत्यंत उपयुक्‍त असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

महापालिका कर्मचाऱ्यांना कुठल्याही प्रकारे संसर्गजन्य आजारांची लागण होऊ नये, यासाठी कर्मचाऱ्यांची कार्यालयात उपस्थिती दर्शवणारी “फेस रेकग्नाईज आधार व्हेरिफाईड अटेंडन्स सिस्टिम” अत्यंत उपयुक्त आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद सुलभ आणि सुरक्षित होणार असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना केले. यापूर्वी, ह्या सिस्टीमचा नायर रुग्णालयात यशस्वी प्रयोग करण्यात आला होता. आता महापालिकेच्या  “डी” विभाग कार्यालयात या प्रणालीचा अवलंब केला जात आहे. ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना बायोमेट्रीक मशिनवर बोटाचे ठसे लावण्याची गरज नसून मशिनसमोर उभे राहिल्यास त्या व्यक्तीची आधार कार्डवरील फोटोशी सांगड घालून हजेरी नोंद होवू शकते. त्यामुळे भविष्यात बोटाच्या ठशांमुळे बायोमेट्रीक हजेरी नोंदवून कोरोना व इतर संसर्गजन्य आजाराचा संभाव्य धोका टाळता येणार असून भविष्यात कर्मचाऱ्यांची अचूक व शंभर टक्के हजेरी महापालिकेला नोंदविता येणे शक्य होणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

- Advertisement -

नवीन प्रणालीमुळे महापालिका कर्मचाऱ्यांनी स्पर्श न करता मशिनसमोर उभे राहताच हजेरी नोंद होत आहे. त्यामुळे या यशस्वी प्रयोगानंतर आता महापालिका मुख्यालयासह सर्व विभाग कार्यालय व इतर कार्यालयांमध्ये या मशीन्स बसवल्या जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. कोरोनाचा आजार अधिक प्रमाणात पसरु नये व कोरोनामुळे अशाप्रकारे बोट दाबून हजेरी नोंदविणे घातक असल्याने पर्यायी व्यवस्था उभी करावी अशी मागणी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे महापौरांकडे केली होती. त्यानुसार महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले. आयुक्तांनी त्यानंतर प्रमुख अभियंता यांत्रिक व  विद्युत विभागाला आदेश देत हजेरीची नवीन प्रणाली विकसित करण्यास सांगितले. त्यानुसार या विभागाने निविदा मागवून  या प्रणालीचा अवलंब महापालिकेत करण्याचा निर्णय घेतल्याचे महापौरांनी सांगितले.

या प्रणालीमुळे हजेरी नोंदवणारी व्यक्ती ही  मोबाईलला आधार क्रमांक लिंक केलेली व्यक्ती आहे किंवा अन्य आहे याप्रमाणे प्रणाली त्याचा स्वीकार करेल आणि हजेरी नोंदवेल. त्यामुळे अचूक व्यक्तीची हजेरी लागेल. ज्यामुळे कर्मचाऱ्यांची दक्षताही घेतली जाईल आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यानुसार सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून मार्च महिन्यापासून महापालिका कार्यालयांमध्ये बायोमेट्रीक हजेरी प्रणाली बंद करण्यात आली व ही प्रणाली आजतागायत बंद असल्याचे महापौरांनी सांगितले.

- Advertisement -

बायोमेट्रीक हजेरी प्रणालीचा अवलंब कोरोनाचा धोका लक्षात घेता अजुनही करण्यात येत नसून कर्मचारी हजेरी नोंदवहीवरच स्वाक्षरी करीत असल्यामुळे यावर पर्याय म्हणून मुंबई महापालिकेने बायोमेट्रीक प्रणालीमध्ये उपस्थिती नोंदविण्यासाठी लिनक्स बेस्ड “फेस रेकग्नाईज आधार व्हेरिफाईड अटेंडन्स सिस्टिम” याचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला असल्याचे महापौरांनी सांगितले.

कशी होणार नोंदणी ?

या प्रणालीत नोंदणी करताना प्रत्येक कर्मचाऱ्याला आपले आधार कार्ड व ज्या मोबाईल क्रमांकाला आधार लिंक केले आहे तो फोन जवळ बाळगणे आवश्यक आहे. या प्रणालीत आधार  लिंक केल्यानंतर कर्मचाऱ्याच्या मोबाईलवर ओटीपी क्रमांक येईल. हा ओटीपी या प्रणालीत समाविष्ठ केल्यानंतर प्रणाली अपटेड होईल. त्यानंतर प्रणालीवर संबंधित कर्मचाऱ्यांचे डोळे बंद करून छायाचित्र टिपले जाईल. यावर संबंधित व्यक्तीचे काढलेले छायाचित्र आणि आधार कार्डवरील छायाचित्र यातील चेहरा किती टक्के जुळतो हे प्रणालीवर दिसेल आणि त्याप्रमाणे प्रणालीने त्यांचा डेटा स्वीकारल्यास पुढील नोंदणीची कार्यवाही होईल.  त्यामुळे ज्यांची नोंदणी पूर्ण होईल त्याच कर्मचाऱ्याची या मशिनसमोर उभे राहताच हजेरी नोंद होईल. या नवीन प्रणालीत स्पर्श न करता केवळ मशीनसमोर उभे राहताच हजेरी नोंदवली जाणार आहे. ज्यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळही वाचणार असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.


हेही वाचा – मुंबईच्या महापौरही म्हणतात ‘या’ तारेखेपासून लोकल सुरू होऊ शकते

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -