फेसबुकवर नवं फिचर; वाचता येणार बातम्या

या फिचरमध्ये बातम्यांसाठी चार विभाग करण्यात आले आहेत. जनरल, टॉपिकल, डायवर्स आणि स्थानिक बातम्या असे हे विभाग असणार आहेत.

facebook users increased reaching at 2.38 billion users

फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर लवकरच नवं फिचर लॉन्च होत आहे. या फिचरच्या साहाय्याने नेटकऱ्यांना फेसबुकवरच बातम्या वाचता येणार आहेत. या फिचरमध्ये बातम्यांसाठी चार विभाग करण्यात आले आहेत. जनरल, टॉपिकल, डायवर्स आणि स्थानिक बातम्या असे हे विभाग असणार आहेत. सध्या अमेरिकेत या फिचरची चाचणी घेण्यात येत आहे. त्यानुसार २ लाख युजर्सना मर्यादित कालावधीकरिता हे फिचर वापरता येणार आहे. ‘द वॉल स्ट्रीट’ जनरलच्या अहवालानुसार, या फिचरसाठी फेसबुकनं सुरुवातीला एबीसी न्यूज, एनबीसी न्यूज, फॉक्स न्यूज, द न्यू यॉर्क टाइम्स, द लॉस एंजलिस, ब्लूमर्ग मीडिया, आदी वृत्तपत्रांसोबत करार केला आहे. या करारानुसार फेसबुक या सर्व वृत्तसंस्थांना मोबदला देणार आहे. यापुढे आणखी काही वृत्तपत्रांसोबत जोडण्याचा प्रयत्न फेसबुक करणार आहे.

नव्या फिचरमध्ये ही सुविधा

फेसबुकचे ‘न्यूज टॅब’ हे फिचर युजर फ्रेंडली असणार आहे. त्यातील Today’s stories या भागासाठी पत्रकारांची एक टीम तैनात करण्यात येईल. ही टीम दिवसभराच्या महत्त्वाच्या घडामोडी वाचकांसाठी निवडणार आहे. येथे युजर्सना त्यांच्या पसंतीनुसार बातम्या निवडता येणार आहेत. येथे युजर्सना अनेक पब्लिशर्स कडून पेड सब्सक्रिप्शनसुद्धा उपलब्ध असणार आहे. मनोरंजन, बिझनेस, हेल्थ, तंत्रज्ञान आणि क्रिडा या विभागातील बातम्यासुद्धा वाचकांना वाचता येणार आहेत. ‘या फिचरमुळं सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फेक न्यूजला आळा बसेल. फेसबुकचं हे नवीन सेक्शन योग्य आणि अधिकृत बातम्या युजर्सपर्यंत पोहचवण्यासाठी मदत करेल.’ असं फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्गनं सांगितलं आहे.