तुमच्या अहंकाराचा भुर्दंड मुंबईकरांना कशाला? Metro कारशेडवरुन फडणवीसांची टीका

Devendra fadnavis and Uddhav Thackeray
मुख्यमंत्री ठाकरे यांच्या कोरोनाच्या जागतिक भ्रमणावरून फडणवीसांचा आर्थिक टोला

ठाकरे सरकारने आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेड अखेर हलविले असून आता कांजूर येथे मेट्रो कारशेड होणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी लाईव्ह साधलेल्या संवादादरम्यान केली. मात्र ठाकरे सरकारच्या या निर्णयावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडाडून टीका केली आहे. आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा दुर्दैवी असून हा निर्णय केवळ अहंकारातून घेतला आहे. तसेच कांजूरमार्गला मेट्रो कारशेड नेल्यास ४ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड मुंबईकरांना सोसावा लागेल, असे याच सरकारने स्थापन केलेल्या समितीने सांगितले असल्याची आठवण फडणवीस यांनी करुन दिली. हा भुर्दंड राज्य सरकार आपल्या अहंकारासाठी कुणाच्या माथी मारू इच्छिते? आणि कशासाठी? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

कांजूरमार्गच्या जागेचा यापूर्वी सरकारने विचार केला. पण त्यावर मा. उच्च न्यायालयाची स्थगिती होती. काही खासगी व्यक्तींनी त्या जागेवर दावा सांगितला. स्थगिती मागे घ्यावी, म्हणून विनंती करण्यात आली, तर न्यायालयाने दावे पुढील काळात निकाली निघाले, तर त्यासाठीची रक्कम भरण्यास सांगितले. ही रक्कम २०१५ मध्ये सुमारे २४०० कोटी रुपयांच्या आसपास होती. आज त्या प्रकरणाची सद्यस्थिती काय? प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टात गेले तर विलंबाला जबाबदार कोण? असाही प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

फडणवीस पुढे म्हणाले की, “कांजूरमार्गची जागा ‘Marshy land‘ असल्याने त्याला स्थिर करण्यासाठी किमान २ वर्षांचा अवधी लागेल. याशिवाय आतापर्यंतच्या सर्व निविदा रद्द कराव्या लागतील आणि नव्याने संपूर्ण प्रक्रिया राबवावी लागेल. या नवीन जागेसाठी डीपीआर किंवा फिजीबिलीटी अहवाल काहीही तयार झालेले नाही. म्हणजे जो मेट्रो प्रकल्प पुढच्यावर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता, तो आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे. आरेच्या कारशेडसाठी ४०० कोटी आधीच खर्च झालेले आहेत. स्थगितीमुळे १३०० कोटी पाण्यात गेले. शिवाय ४००० कोटींचा वाढीव भार पडणार तो वेगळाच. कांजूरमार्ग जागेचा वाद कायम राहिल्यास २४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार.”

आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खिळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते? जनतेची किती मोठी ही दिशाभूल आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

मात्र उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेडच्या निमित्ताने होणाऱ्या खर्चाबाबत विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या टिकेवर उत्तर दिले होते. खर्चाबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दा उपस्थित केला होता. जनतेचा पैसा जास्त प्रमाणात वापरला जाईल, असा आक्षेप त्यांनी आरे कारशेडची जागा बदलण्याच्या मुद्द्यावर घेतला होता. पण कांजुर येथील कारशेडच्या जागेसाठी मात्र कोणताही खर्च सरकारला येणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच सरकारी जमीनीचा वापर हा जनतेच्या हितासाठी करत आहोत, असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचवेळी फडणवीस सरकारच्या काळातील कोट्यावधी वृक्ष लागवडीचीही फिरकी मुख्यमंत्र्यांनी घेतली. कोट्यावधी वृक्ष लावलेले कुठेच दिसत नाहीत. पण जे जंगल आहे ते आधी वाचवलं आहे, असाही चिमटा मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढला. आरे कारशेड कांजुरला हलवून जंगल जपल्याच समाधान असल्याचेही ते यावेळी म्हणाले.