घरCORONA UPDATEमुंबईपाठोपाठ ठाण्यात प्रवासाच्या बोगस ई-पासेसचं रॅकेट उघड!

मुंबईपाठोपाठ ठाण्यात प्रवासाच्या बोगस ई-पासेसचं रॅकेट उघड!

Subscribe

लॉकडाऊनमध्ये राज्यभरात अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावी जाण्यासाठी शासनाकडून ई-पासेस देण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. मात्र राज्यात अनेक ठिकाणी बोगस ई-पासेस तयार करण्याचा गोरखधंदा सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. मुंबईनंतर ठाणे पोलिसांनी बोगस कागदपत्रे सादर करून ई-पासेस तयार करून देणाऱ्या एका टोळीचा छडा लावला असून या टोळीतील दोघांविरुद्ध कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ही कारवाई परिमंडळ ३चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या पथकाने केली आहे.

पास काढण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याभरात अनेक जण अडकून पडलेले, तसेच लॉकडाऊन मध्ये हाताला काम नसल्यामुळे त्यांना आपल्या मूळगावी जाण्यासाठी किंवा अत्यावश्यक कामासाठी जिल्ह्याच्या बाहेर जाणाऱ्यांसाठी शासनाने covid19.mhpolice.in या संकेतस्थळावर ई-पासेसची सुविधा उपलब्द करून दिलेली आहे. या संकेतस्थळावर मागवण्यात आलेली माहिती तसेच इतर कागदपत्रे अपलोड केल्यानंतर संबंधित अर्जदाराच्या कागदपत्रांची खातरजमा करून त्यांना मोफत ई-पासेस उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

- Advertisement -

संकेतस्थळावर ई-पासेसाठी अर्ज करणे हा प्रकार अनेकांना किचकट आणि वेळखाऊ वाटत आहे. तसेच अशिक्षित नागरिकांना त्याचे ज्ञान नसल्यामुळे अशा नागरिकांकडून हजारो रुपये उकळून बोगस कागदपत्रांच्या सहाय्याने ई-पासेस काढून देणाऱ्या टोळ्या राज्यभरात कार्यरत आहेत. मुंबई पोलिसांनी अशा एका टोळीवर नुकतीच कारवाई केली. मुंबईपाठोपाठ ठाणे पोलिसांच्या परिमंडळ ३ मध्ये सायबर कॅफेवर कारवाई करून बोगस कागदपत्रांच्या साहाय्याने ई-पासेस बनवून देणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

सायबर कॅफेतून देत होते बोगस प्रमाणपत्र

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिमंडळ ३ पोलीस उपायुक्त यांचे कार्यालय कल्याण पश्चिम खडकपाडा परिसरात असून या कार्यालयातून परिमंडळ ३ (कल्याण-डोंबिवली) परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी ई-पासेस देण्याची सुविधा उपलब्ध आहे. या कार्यालयात ऑनलाईन येणारे अर्ज तपासत असताना त्यात काही अर्जात जोडण्यात आलेले महानगरपालिकेचे कंटेन्मेंट झोन नसल्याचे बोगस प्रमाणपत्रे, तसेच बोगस वैद्यकीय प्रमाणपत्रे आढळून आली. या अनुषंगाने परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी कल्याण खडकपाडा या ठिकाणी सायबर कॅफे चालवणारा प्रमोद दिनकर भुजबळ (वय ३२) याने कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक पास करता एक ते दोन हजार रुपये घेऊन बोगस प्रमाणपत्रे जोडून ई -पासेस देत असल्याचे समोर आले. या प्रकरणी या प्रमोद भुजबळ आणि कुमार पद्माकर पवार (वय २२) या दोघांविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांना चौकशीकामी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -