मुंबई : छोट्या पडद्यापासून ते बॉलिवूडपर्यंत अभिनयाने आणि कॉमेडीने आपली खास ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर येत आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. (Famous comedian Tiku Talsania suffers heart attack and is in critical condition)
मिळालेल्या माहितीनुसार, 70 वर्षीय टिकू तलसानिया यांना आज, शनिवारी (11 जानेवारी) सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
हेही वाचा – Deepika Padukone : दीपिका अभिनयाबरोबरच आहे बिझनेसवुमन
टिकू तलसानिया यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांचा जन्म 1954 मध्ये झाला आहे. ‘ये जो है जिंदगी’ या लोकप्रिय टीव्ही शोमधून त्यांनी 1984 मध्ये आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर त्यांनी 1986 मध्ये ‘प्यार के दो पल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. चार दशकांच्या कारकिर्दीत, टिकू तलसानिया यांनी विनोदी ते गंभीर अशा सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे संवाद आणि विनोदी टायमिंग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. “वन बाय वन”, “हुकुम मेरे आका”, “गोलमाल है भाई सब गोलमाल है”, “सजन रे झूट मत बोलो” यांसारख्या टीव्ही शोमध्ये त्यांनी काम केले आहे, तर “दिल है की मानता नही”, “अंदाज अपना अपना”, “देवदास”, “धमाल”, “स्पेशल 26” आणि “सर्कस” सारख्या बॉलिवूडच्या हिट चित्रपटांमध्ये अभिनय साकारला आहे. अलीकडेच, टिकू तलसानिया हे ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’ चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात राजकुमार राव, तृप्ती डिमरी आणि अर्चना पूरण सिंग यांसारखे कलाकारही होते.
टिकू तलसानिया यांच्याबद्दल
दरम्यान, टिकू तलसानिया यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सांगायचे झाले तर त्यांचे लग्न दीप्ती तलसानियाशी झाले आहे. त्यांना रोहन तलसानिया आणि शिखा तलसानिया ही दोन मुले आहेत. रोहन तलसानिया हा संगीतकार आहे आणि त्यांची मुलगी शिखा तलसानिया ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. शिखाने आतापर्यंत “वीरे दी वेडिंग”, “कुली नंबर 1” “आय हेट लव्ह स्टोरीज” सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
हेही वाचा – Untold Story : 8 लग्न करूनही प्रेम न मिळालेली अभिनेत्री