घरमुंबईभिवंडीत रिलायन्स गॅस पाईपलाईन विरोधात शेतकरी आक्रमक

भिवंडीत रिलायन्स गॅस पाईपलाईन विरोधात शेतकरी आक्रमक

Subscribe

गुजरात राज्यातील दहेज ते नागोठणे या दरम्यान टाकण्यात येत असलेल्या गॅस पाईपलाईनसाठी अधिग्रहित केलेल्या जमिनीचा मोबदला न देताच गॅस पाईपलाईनचे काम हाती घेतलेल्या रिलायन्स गॅस कंपनीने स्थानिक राजकीय पुढार्‍यांना हाताशी धरून बाधित शेतकर्‍यांना जमिनीचा योग्य मोबदला न देताच शेतात खोदकाम करून पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु केले आहे. मोबदल्यात येथील शेतकर्‍यांची फसवणूक झाली आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून शेतकरी ओरड करीत आहेत.मात्र रिलायन्स कंपनी पोलिसांची मदत घेऊन दहशत निर्माण करून शेतकर्‍यांचा विरोध चिरडून टाकत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सचिव राजन गावंड यांनी कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांना निवेदन देऊन शेतकर्‍यांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.

भिवंडी तालुक्यातील दाभाड परिसरातील किरवली, कोटाची जांभीवली या भागात पडघा व गणेशपुरी पोलिसांच्या फौजफाट्यात रिलायन्स गॅस पाईपलाईन कंपनीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. मात्र येथील शेतकर्‍यांना आतापर्यंत जमिनीचा योग्य मोबदला रिलायन्स कंपनीने दिलेला नाही. काही गावांमध्ये तुटपुंजा मोबदला देऊन शेतकरी कुटुंबांना वेठीस धरण्याचे कटकारस्थान रिलायन्स कंपनी व्यवस्थापनाने सुरु केले आहे. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून भादाणे, कुरुंद या गावांसह तालुक्यातील ज्या शेतकर्‍यांना जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नाही अशा बाधित शेतकर्‍यांनी शेतात एकत्रितपणे जमून पाईपलाईन टाकण्याच्या कामास विरोध सुरु केला आहे.

- Advertisement -

शेतकर्‍यांचा वाढता विरोध लक्षात घेता कंपनी पोलीसांना हाताशी धरून येथील शेतकर्‍यांवर केव्हाही कारवाई करण्याची शक्यता आहे. मात्र पोलिसांनी असे कोणतेही कृत्य शेतकर्‍यांच्या विरोधात करू नये, अशी विनंती मनसे प्रदेश सचिव राजन गावंड यांनी केली आहे. स्थानिक शेतकर्‍यांची राजकारणी दलालांनी फसवणूक करून रिलायन्स कंपनीच्या फायद्यासाठी काम केले आहे.परंतु आता पोलीस प्रशासन कंपनीच्या फायद्यासाठी शेतकर्‍यांवर दहशत निर्माण करून अन्याय करीत आहे. मात्र शेतकर्‍यांचा उद्रेक झाल्यास मोठ्या गंभीर परिणामाला जिल्हा प्रशासनास सामोरे जावे लागेल, असे सांगत शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा अंत रिलायन्स कंपनी व शासकीय प्रशासनाने बघू नये असा इशारा राजन गावंड यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -