राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत विरोधकांचे टेन्शन वाढले

शरद पवारांनंतर फारूख अब्दुल्लांचाही नकार

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीबाबत विरोधकांच्या चिंतेत शनिवारी आणखीन भर पडल्याचे चित्र आहे.राष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी स्वीकारण्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूख अब्दुल्ला यांनीही या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास नकार दिला आहे. शनिवारी फारूख अब्दुल्ला यांच्या वतीने प्रसिद्धिपत्रक जारी करीत ही माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली.

या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माझे नाव पुढे केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच ज्या नेत्यांनी मला पाठिंबा देण्याचे वचन दिले त्यांचाही मी आभारी आहे. जम्मू-काश्मीर सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे, ज्याला सामोरे जाण्यासाठी माझ्या मदतीची आवश्यकता आहे. म्हणूनच मी माझे नाव या निवडणुकीतून मागे घेत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

फारूख अब्दुल्ला यांच्या नकारानंतर विरोधकांच्या चिंतेत आणखीन भर पडल्याचे बोलले जात आहे. ममता बॅनर्जी यांनी १५ जून रोजी बोलावलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत शरद पवार यांच्यासोबत फारूख अब्दुल्ला, गोपाळ कृष्ण गांधी आणि एनके प्रेमचंद्रन यांच्या नावावरही चर्चा झाली आहे, मात्र आतापर्यंत दोन नेत्यांनी नकार दिल्यामुळे उमेदवारीवरून विरोधकांचे टेन्शन वाढले आहे.