घरमुंबई'विना मास्क' फिरणाऱ्या मुंबईकरांकडून आतापर्यंत ४९ कोटींची दंड वसुली

‘विना मास्क’ फिरणाऱ्या मुंबईकरांकडून आतापर्यंत ४९ कोटींची दंड वसुली

Subscribe

मुंबई महापालिकेने सर्वाधिक म्हणजे ४३ कोटी ८२ लाख ५१ हजार ८०० इतकी रक्कम दंड वसुलीपोटी जमा केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सरकारने मार्च २०२० पासून नागरिकांना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक केले होते. मात्र, असे असतानाही नागरिकांकडून या नियमाचे उल्लंघन होताना दिसत आहे. मुंबईत रेल्वे स्टेशन परिसर, शहर व उपनगरे येथील अनेक सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून महापालिका प्रशासन, रेल्वे प्रशासन आणि मुंबई पोलीस यांनी मार्च २०२० ते २ एप्रिल २०२१ या कालावधीत तब्बल ४९ कोटी १५ लाख ४६ हजार ८०० रुपये इतकी रक्कम दंड वसुलीपोटी जमा केली आहे. मुंबई महापालिकेने सर्वाधिक म्हणजे ४३ कोटी ८२ लाख ५१ हजार ८०० इतकी रक्कम दंड वसुलीपोटी जमा केली आहे. तर मुंबई पोलिसांनी ४ कोटी ८८ लाख ७० हजार ४०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. त्याचप्रमाणे, रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या कारवाईत, ४४ लाख २४ हजार ६०० रुपये इतकी रक्कम दंड वसुलीपोटी जमा केली आहे.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण फेब्रुवारी २०२० पासून सापडू लागले. त्यानंतर मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. त्यामुळे पालिकेने कोरोनाला रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्याची कारवाई सुरू केली. पालिकेने, ९ एप्रिल ते २१ ऑक्टोबर २०२० या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या १ लाख ७५२ लोकांकडून २ कोटी ३० लाख २९ हजार ४०० रुपये इतकी रक्कम दंडापोटी वसूल केली होती. तर, २० एप्रिल ते १५ डिसेंबर २०२०या कालावधीत १४ कोटी ४ लाख ६ हजार २०० रुपये एवढी दंड रक्कम वसूल केली होती.

- Advertisement -

मार्च २०२० पासून ते ९ मार्च २०२१ या कालावधीत विना मास्क फिरणाऱ्या १८ लाख ४५ हजार ७७७ नागरिकांवर कारवाई करून तब्बल ३७ कोटी २७ लाख ८५ हजार ६०० रुपये एवढी रक्कम दंड वसुली पोटी जमा केली होती. वास्तविक, मार्च २०२० ते २ एप्रिल २०२१ या कालावधीत विना मास्क फिरणाऱ्यांकडून पालिका, पोलीस, रेल्वे प्रशासन यांनी दंडात्मक कारवाई करून तब्बल ४९ कोटी १५ लाख ४६ हजार ८०० रुपये इतकी रक्कम दंड वसुलीपोटी जमा केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -