घरमुंबईविजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव

विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव

Subscribe

कोरोना वॉर्डच्या आयसीयूतील एसीचा स्फोट

नाशिक येथील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या गळतीमुळे 24 रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच विरारमधील विजय वल्लभ या खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 1६ कोरोनाबाधित रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यात सहा महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे. ही घटना पहाटे तीनच्या सुमारास घडली. वसई-विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासात आगीवर काबूत मिळवला. विरार पश्चिम येथील चार मजली विजय वल्लभ या हॉस्पिटलमध्ये 90रुग्ण उपचार घेत होते. त्यातील 17 कोरोनाबाधित रुग्ण दुसर्‍या मजल्यावरील अतिदक्षता विभागात उपचार घेत होते. पहाटे तीनच्या सुमारास रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाला. त्यानंतर काही मिनिटातच आगीने अतिदक्षता विभागात आगीचे तांडव केले. आग लागली तेव्हा त्या ठिकाणी 17 रुग्ण होते. आग लागल्यावर डॉक्टर आणि कर्मचारी सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाले.

तर वॉर्डच्या दरवाजानजिक असलेल्या चार रुग्णांना वाचवण्यात यश आले. या आगीत 13 जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला होता.तर शिवाजी विरकर आणि जानवी जोशी यांचा दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन तासात आगीवर नियंत्रण मिळवले आहे. पण,तोपर्यंत 15 जणांना आपला जीव गमवावा लागला. आगीत अतिदक्षता विभाग जळून खाक झाला आहे. आग लागली त्यावेळी रुग्णालयात 90 रुग्ण उपचार घेत होते. यातील वीस रुग्णांना दहिसर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. इतरांना वसई-विरार परिसरातील रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान, आगीचीमाहिती मिळाल्यानंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी या ठिकाणी एकच आक्रोश केला होता. त्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला.

- Advertisement -

या घटनेत रुग्णालय प्रशासनाला दोषी ठरवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली. या घटनेची पाहणी करण्यासाठी आलेल्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाही संतप्त नातेवाईकांनी घेराव घातला होता.आगीची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, महापालिका आयुक्त गंगाधरन, डी.आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, पोलीस अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते, पालकमंत्री दादा भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही घटनास्थळी येऊन माहिती घेतली.

मृत पावलेले रुग्ण :
1.उमा सुरेश करगुंटकर (63), 2.निलेश भोईर (35), 3.पुखराज वैष्णव (68), 4.रजनी कडू (60), 5.नरेंद्र शंकर शिंदे (58), 6.कुमारकिशोर दोशी (45), 7.जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (63), 8.रमेश उपायन (55), 9. प्रवीण गौडा (55), 10.उमेश राजेश राऊत (23), 11.शमा अरुण म्हात्रे (48), 12.सुवर्णा पितळे (64), 13. सुप्रिया देशमुख (43), 14.शिवाजी विरकर (56), 15.जानवी जोशी (महिला), १६. नीरव संपत (३०)

- Advertisement -

फायर ऑडीट होऊनही आग
रुग्णालयाचे फायर ऑडीट झाल्याचे वसई-विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख दिलीप पालव यांनी सांगितले. असे असतानाही आग का लागली याबद्दल महापालिका प्रशासनावर टीका केली जात आहे. एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाल्याने ही आग लागली. हॉस्पिटलचे फायर ऑडीट झाले आहे. इतर रुग्णांना दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे, अशी माहिती रुग्णालयाचे संचालक दिलीप शाह यांनी दिली.

पतीच्या निधनानंतर पत्नीचा धक्क्याने मृत्यू
आगीत पती कुमार दोशी यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यावर पत्नी चांदनी यांना हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी त्यांना वसईतील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पण, पती निधनाच्या धक्क्याने त्या वाचू शकल्या नाहीत. दुपारी उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला.

घरी जाण्याऐवजी स्मशानभूमीत
खानिवडे गावात राहणार्‍या रजनी कडू यांची ऑक्सिजन लेव्हल गुरुवारी 96वर गेली होती. त्यामुळे त्या सुस्थितीत असल्याने त्यांना घरी जाण्याची परवानगी मिळाली होती. शुक्रवारी त्या घरी परतणार होत्या; पण, काळाने त्यांच्यावर घाला घातला. घरी जाण्याऐवजी त्यांचा मृतदेह रुग्णालयातून थेट स्मशानभूमीत नेण्याची वेळ आली.

ती कोरोनातून बरी झाली, पण…
कळंबच्या क्षमा अरुण म्हात्रे यांनी कोरोनावर मात केली होती. शुक्रवारीत्यांना घरी पाठवण्यात येणार होते. पण,आगीने घात केला.गेल्या एक महिन्यापासून उपचार घेऊन ठिक झालेल्या क्षमा यांचा आगीच्या तांडवात मृत्यू झाला. कळंबगाव सध्या रेडझोनमध्ये आहे. गावात गेल्या आठवड्याभरात सात-आठ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत क्षमा म्हात्रे पहिल्या रुग्ण ठरल्या होत्या.

सेंट्रलाईज एसी कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. ज्याकाही चुका झाल्या त्या प्रशासनाने मान्य करायला हव्यात. आणि भविष्यात वसई-विरारमध्येच नव्हेतरसंपूर्ण देशात अशा घटना घडू नयेत म्हणून काळजी घ्यायला हवी.

आपल्या परिने काय करता येईल-कशीमदत देता येईल, हे पाहू -आमदार हितेंद्रठाकूर झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या हॉस्पिटलमध्ये 79 रुग्ण उपचार घेत होते. दुसर्‍या मजल्यावर आग लागली तेव्हा आयसीयू विभागात 17 रुग्ण होते. त्यातील 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.उर्वरित रुग्णांना अन्य हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीने मृत रुग्णाच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे.

चौकशीअंती दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल – दादाजी भुसे,पालकमंत्री
मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख केंद्र आणि राज्य सरकारसह वसई-विरार महापालिकेने मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतजाहीर केली आहे. या घटनेची स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेऊन दुःख व्यक्त केले. केंद्र सरकारने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना पन्नास हजारांची मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये तर जखमींना एक लाखांची मदत जाहीर केली आहे.त्याचबरोबर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना वसई-विरार महापालिकेकडून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.

घटनेची चौकशी होणार
आगीची चौकशी करण्यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत वसई-विरार महापालिका आयुक्त गंगाथरन, पोलीस उपायुक्त संजय पाटील, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ.दयानंद सुर्यवंशी आणि महापालिकेच्या अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी दिलीप पालव यांचा समावेश आहे. या दुर्घटनेची 15दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश नगरविकास खात्याने दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -