घरमुंबईएका ठिणगीने घात केला...! फायर ऑडिट कागदावरच, हॉस्पिटलमध्ये सदोष यंत्रणा

एका ठिणगीने घात केला…! फायर ऑडिट कागदावरच, हॉस्पिटलमध्ये सदोष यंत्रणा

Subscribe

कोरोना रुग्ण उपचार घेत असलेल्या अतिदक्षता विभागात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कॅसेट एसीच्या यंत्रातून एक ठिणगी बाहेर पडली आणि अवघ्या काही सेकंदातच त्या ठिकाणी स्फोट होऊन आगीचे तांडव सुरू झाले. त्यात सोळा जणांचे बळी गेले. हॉस्पिटलचे फायर ऑडिट कागदावरच झाले असून येथील सर्वच यंत्रणा सदोषअसल्याची धक्कादायक माहिती हाती लागली आहे.शुक्रवारी पहाटे विरारमधील विजय वल्लभ हॉस्पिटलमधील अग्निकांडात हॉस्पीटल प्रशासनाच्या हलगर्जीपणासोबतच महापालिका अधिकार्‍यांशी तडजोड करून दिले गेलेले अनेक परवाने कारणीभूत असल्याचे आता समोर आले आहे.आग लागलेल्या अतिदक्षता विभागात तीन कॅसेट एसी होत्या. त्यातील मध्यभागी असलेल्या कॅसेट एसीतून एक ठिणगी खाली पडली. त्यावेळी ड्युटीवर असलेली नर्स घाबरून दरवाजाकडे मदतीसाठी पळाली.

पण, दरवाजापर्यंत पोचण्याआधीच काही सेकंदातच मोठा स्फोट होऊन आग लागली. त्याही स्थितीत अतिदक्षता विभागाच्या दरवाजानजिक असलेल्या तीन रुग्णांना वाचवण्यात यश आले होते. पण, त्यातील दोन जण दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मृत्यू पावले. तर आगीत होरपळून तेरा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. कॅसेट एसीतून एक ठिणगी उडून स्फोट झाला त्याअर्थी अतिदक्षता विभागात वायूची गळती असावी, असाअंदाज बांधला जात आहे. एक तर येथील रुग्ण ऑक्सिजनवर होते. त्यामुळे ऑक्सीजनची थोडीफार गळती असावी. त्याचबरोबर अतिदक्षता विभागात सॅनिटायझर, सफाईसाठी वापरण्यात येणारे केमिकलयुक्त पदार्थ अशा विविध माध्यमातूनही त्यावेळी ज्वलनशील वायू हवेत पसरला असण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरच्या खोलीतील हवा खेळती राहण्याची व्यवस्था नसल्याने हा वायू त्या ठिकाणीच जमा झालेला असल्याने ठिणगी पडल्यानंतर त्याचा स्फोट होऊन आग लागली असण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.अतिदक्षता विभागात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून तंत्रज्ञ स्फोटाची कारणे नक्कीच शोधतील. त्यासाठीच पोलिसांनी या विभागातील सीसीटीव्ही फुुटेज ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते. हॉस्पीटलमधील एसीत बिघाड झाल्यानेच ठिणगी उडाली होती. याचाअर्थ येथील इलेक्ट्रिकल यंत्रणेत दोष असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाकडून झालेल्याऑडिटवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेचा तपास करणार्‍या जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनीही येथील अग्नि सुरक्षेवर संशय व्यक्त केला आहे. इमारतीत आपत्कालीन स्थितीत रेफ्युजी एरिया असणे आवश्यक असताना त्याही नसल्याकडेही जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष वेधले आहे.

हॉस्पिटलच्या इमारतीत बेकायदा फेरबदल
वसई-विरार महापालिका प्रशासनाने फायर ऑडिट दाखवण्यापुरते न करता प्रत्यक्षात जागेवर जाऊन केले असते तर हा प्रसंग टाळता आला असता. बिल्डींगला महापालिकेने ओसी दिल्यानंतर त्या जागेत हॉस्पीटल सुरु करण्यासाठी व्यवस्थापनाने विविध परवाने घेतले आहेत. त्यात अग्निशमन दलाचा परवाना महत्वाचा आहे. हॉस्पीटल व्यवस्थापनाने इमारतीत अनेक बेकायदा फेरबदल केले आहेत. त्यात आपत्कालीन परिस्थितीत बाहेर जाण्यासाठी असलेला मार्ग व्यवस्थापनाने भिंत बांधून बंद केल्याचे उजेडात आले आहे.त्याच बरोबर इमारतीत असलेल्या मोकळ्या जागांवर केबिन, बांधकामे करून महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. फायर ऑडिट करण्यात आल्याचा दावा केला जात असला तरी इमारतीमधील धोकादायक बेकायदा बदल अग्निशमन विभागाकडून दुर्लक्षित केले गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

संशयित अधिकारी चौकशी समितीत
नगरविकास विभागाने ह्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्याअध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमली आहे. त्यात वसई-विरार महापालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख अधिकारी दिलीप पालव यांचाही समावेश आहे. पण,पालव यांच्या फायर ऑडिटवरच संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्यांचा समावेश केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -