मित्तल इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग, गाळे खाक

Fire breaks out at Mittal Estate in Mumbais Andheri

मुंबई -: अंधेरी ( पूर्व), मरोळ नाका, येथील परिसरात असलेल्या मित्तल इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दोन गाळे खाक झाले आहेत. सुदैवाने या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांनी काही अवधीतच नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

अंधेरी ( पूर्व), अंधेरी – कुर्ला रोड, मरोळ नाका, येथील परिसरात असलेल्या तळमजला अधिक दोन मजली मित्तल इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे सदर इंडस्ट्रीयल इस्टेट व परिसरात एकच खळबळ उडाली. आगीच्या वृत्तामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य व मदतकार्य सुरू केले. या इंडस्ट्रीयल इस्टेट बिल्डिंग नंबर ५ मधील दुसऱ्या मजल्यावरील दोन गाळ्यांना आग लागली होती. या आगीत गाळे व तेथील सामान जळून खाक झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी ८ फायर इंजिन व ४ वॉटर टँकर यांच्या साहाय्याने या आगीवर सायंकाळी उशिराने नियंत्रण मिळविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र ही आग का व कशी काय लागली याबाबत स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाच्या संबंधित अधिकाऱ्याकडून चौकशी सुरू आहे.


दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंच्या हत्येचा कट रचलेला; माजी पीएचा धक्कादायक आरोप