मुंबादेवीमधील तीन मजली इमारतीला आग; ५ जण जखमी

firebrigade

मुंबादेवी येथील तळमजला अधिक तीन मजली पटेल बिल्डिंगमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीमुळे ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर नजीकच्या जी. टी. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मेमन रोड येथील प्रसिद्ध मुंबादेवी मंदिराजवळील तळमजला अधिक तीन मजली पटेल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फायर इंजिन, वॉटर टँकर यांच्या साहाय्याने या आगीवर पाऊण तासात नियंत्रण मिळवून आग विझविली.

मात्र या आगीमुळे तापनू रॉय (३०), फालस रविदास (२०), फालस मंडल (२०), गुलाधार मंडल (२५) आणि सुजन रविदास (२४) या ५ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने नजीकच्या जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मात्र ही आगीची घटना का व कशी काय घडली याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत.