मुंबईत लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता फटाक्यांवर बंदी

Firecrackers

दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊ घातला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही राज्यांमध्ये फटाके वाजवण्यावर आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान आता मुंबईत लक्ष्मीपूजन दिवशी केवळ खासगी क्षेत्रात सौम्य स्वरुपाचे फटाके फोडण्यास परवानगी देण्यात आली आहे. लक्ष्मीपूजनाचा दिवस वगळता अन्य दिवशी फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात मुंबई पालिका आयुक्तांकडून नवं परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

मुंबईत फटाके फोडण्यासंबंधी पालिकेकडून नियमावली आणि मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग नियंत्रण कायदा १८९७ अंतर्गत कारवाई केली जाईल, असे महापालिकेने सांगितले आहे. कोरोनाचा काळ असल्यामुळे यावर्षी दिवाळी साजरी करताना नागरिकांना कोरोना संदर्भातील प्रतिबंधात्मक खबरदारी घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कोरोनाबाधित रुग्णांना फटाक्यांच्या धुराचा त्रास होता, हीच बाब लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याचबरोबर यंदाच्या दिवाळीत दारापुढे रांगोळी काढताना आणि पणत्या लावताना त्यासोबत पाण्याने भरलेली बादली आणि साबण दरवाजा जवळ आठवणीने ठेवायचा आहे. जेणेकरून घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हात, पाय, चेहरा योग्यप्रकारे धुवूनच घरात प्रवेश करता येईल, अशी मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहे. तसेच सॅनिटायजर हे ज्वालाग्रही असू शकते, ही बाब लक्षात घेऊन दिवाळीच्या निमित्ताने दिवे लावताना सॅनिटायजरचा वापर करू नये, अशीही मार्गदर्शक सूचना करण्यात येत आहे.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी केवळ सोसायटीचे अंगणात किंवा घराच्या अंगणात इत्यादी खासगी परिसरांमध्येच सौम्य स्वरूपाचे फटाके जसे की, फुलबाजी (फुलझडी), अनार (कोठी / झाड) यासारखेच फटाके फोडण्यास मर्यादित स्वरुपात परवानगी देण्यात येत आहे. मात्र, हे करताना नागरिकांनी ‘कोविड’ विषयक आवश्यक ती खबरदारी कटाक्षाने घ्यावयाची आहे. यामध्ये प्रामुख्याने मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे आणि साबणाने हात स्वच्छ धुणे इत्यादी बाबींची काळजी घ्यावी लागणार आहे.

दिवाळीत अशी घ्या खबरदारी

• ‘कोविड’च्या पार्श्वभूमीवर साजरा होत असलेला यंदाचा दिवाळी सण साजरा करताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे, वारंवार साबणाने हात धुणे. तसेच घराबाहेर पडताना किंवा घरी पाहुणे आले असल्यास त्यांच्यासह सर्वांनी मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे.

• यंदाच्या दिवाळीत दरवाज्या जवळ रांगोळी काढताना किंवा दिवे लावताना त्यासोबतच आठवणीने पाण्याने भरलेली बादली आणि साबण दरवाजा जवळ ठेवावयाचा आहे. जेणेकरून, घरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नीट हात, पाय, चेहरा धुवूनच घरात प्रवेश करता येईल.

• यावर्षीची दिवाळी ही नियंत्रित स्वरुपात साजरी करावयाची असल्याने दिवाळीच्या काळात कोणत्याही प्रकारचे सामाजिक एकत्रिकरण (Social Gathering) टाळावे.

• दिवाळीच्या काळात फराळासाठी नातेवाईकांच्या घरी जाणे टाळावे. दिवाळीच्या शुभेच्छा या दूरध्वनीद्वारे किंवा दृकश्राव्य प्रणालीद्वारे (Online Video Conferencing) द्याव्यात.

• वरीलनुसार भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Online Video Conferencing) ओवाळावे, तर भावाने देखील शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी.

• अपवादात्मक प्रसंगी एखाद्या घरी जाणे आवश्यक असल्यास घरात प्रवेश करण्यापूर्वी हात, पाय आणि चेहरा इत्यादी व्यवस्थितपणे साबण लावून धुवून घ्यावा. त्यानंतर ओले हात, पाय पुसण्यासाठी ज्यांच्या घरी गेलो आहोत, त्यांचा रुमाल वापरण्याऐवजी स्वतःचा रुमाल वापरावा. तसेच घरात प्रवेश करताना आणि प्रवेश केल्यानंतर मास्क परिधान करावा.

• दिवाळीकरिता काही खरेदी करण्यासाठी बाहेर जाणे गरजेचे असल्यास शक्यतो कमी गर्दीच्या वेळी आणि कमी गर्दीच्या ठिकाणी जाण्यास प्राधान्य द्यावे.