महाराष्ट्रात २४ वर्षांनी होतेय राज्यसभेची निवडणूक

First time voting for Rajya Sabha elections
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी प्रथमच मतदान, आघाडी आणि भाजपमधील चर्चा निष्फळ

सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भारतीय जनता पक्ष यांच्यातील चर्चा शुक्रवारी निष्फळ ठरल्याने राज्यसभेची निवडणूक अटळ ठरली आहे. आघाडी आणि भाजप यांच्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागांवरून तडजोड न झाल्याने येत्या १० जून रोजी राज्यसभेसाठी प्रत्यक्ष मतदान होईल. राज्यसभेसाठी मतदान खुले करण्याचा कायदा झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असून यापूर्वी १९९८ मध्ये राज्यसभा निवडणुकीसाठी गुप्त मतदान झाले होते. त्यामुळे २४ वर्षानंतर राज्यसभेसाठी प्रथमच मतदान होत आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी अपक्ष आमदाराना आपली मतपत्रिका दाखवणे बंधनकारक नाही. तथापि जे आमदार सत्ताधारी आघाडी किंवा विरोधी पक्षासोबत आहेत, त्यांना मतदानावेळी संबधित पक्ष प्रतिनिधीना मतपत्रिका दाखवणे बंधनकारक आहे किंवा कसे? याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी भारत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेणार आहेत.

महाराष्ट्र विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे राज्यसभेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज दुपारी ३ वाजता संपली. या मुदतीत कुणीही अर्ज मागे घेतला नसल्याने निवडणूक घ्यावी लागणार आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून आघाडीच्यावतीने आज अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, दुग्धविकास मंत्री सुनील केदार आणि शिवसेना खासदार अनिल देसाई यांच्या शिष्टमंडळाने विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

भाजपने राज्यसभेचा तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि त्याऐवजी येत्या २० जून रोजी होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी एक जागा जास्त घ्यावी, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांनी भाजपसमोर ठेवला. मात्र, भाजपनेच आघाडीला चौथा उमेदवार मागे घेण्याचा प्रस्ताव दिला. यावर चर्चा होऊन काहीच तडजोड न झाल्याने आणि दोन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजप आणि शिवसेना आमने सामने ठाकणार आहे.

भाजपला राज्यसभा जास्त महत्वाची : चंद्रकांत पाटील –

दरम्यान, राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा आहे. पण निवडणूक तथ्यांच्या आधारे बिनविरोध होते. त्यामुळे वस्तुस्थिती अशी आहे की भाजपला तीनही जागा मिळायला हव्यात, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. विधान परिषद निवडणुकीबाबत विचार करता येईल. आघाडीच्या नेत्यांनी खूप चर्चा झाल्यानंतर तोच प्रस्ताव वारंवार मांडला. भाजपने तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि विधान परिषदेला चारेवजी पाच जागा देऊ असा प्रस्ताव होता. मात्र, भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. आम्हाला राज्यसभा जास्त महत्वाची आहे, असेही पाटील म्हणाले. आमचा दावा तथ्यांच्या आधारे आहे. आमच्याकडे ३० मते अतिरिक्त आहेत. आम्हाला ११ ते १२ मते कमी आहेत. तर आघाडी ३० अतिरिक्त मतांच्या पुढे जात नाही. त्यामुळे तिसरी जागा भाजप जिंकेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील : संजय राऊत

महाराष्ट्रात शक्यतो राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी. आपण एकमेकांच्या सहमतीने ही निवडणूक लढवावी. कोणत्याही पद्धतीने घोडेबाजाराला वाव राहू नये यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्न केल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.

आघाडी आणि भाजपकडून काही प्रस्तावाचे आदानप्रदान झाले . मात्र, दोन्ही बाजू आपल्या भूमिकांवर ठाम आहे. भाजप त्यांचा उमेदवार मागे घेण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे आता निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोरे जाणे आणि महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आणणे ही आमची जबाबदारी आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचा चौथा निवडून येईल, असा विश्वासही राऊत यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केला.

अपक्षांची मते निर्णायक

राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदारांची मते निर्णायक ठरणार आहेत. अपक्ष आमदाराना त्यांची मतपत्रिका दाखवणे बंधनकारक नाही. तथापि जे अपक्ष आमदार आघाडी किंवा विरोधी पक्षासोबत आहेत, अशा आमदारांना आघाडी किंवा भाजपच्या पक्ष प्रतिनिधीना मतपत्रिका दाखवणे बंधनकारक आहे किंवा कसे? याबाबत भारत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आयोगाला पत्र पाठवणार आहेत.
घोडेबाजार होणार

सहाव्या जागेवरील उमेदवार निवडून आणण्यासाठी आघाडी आणि भाजपची मदार अपक्ष आमदारांवर आहे. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होऊन अपक्षांचा भाव भलताच वाढणार आहे. आघाडी आणि भाजपने अपक्षांना गळ घालण्यास सुरुवात केली असून एका मताचा भाव काही कोटीत जाणार असल्याची चर्चा आहे.
विधानसभेतील पक्षीय बलाबल

काँग्रेस ४४, राष्ट्रवादी ५३, शिवसेना ५५, भाजप १०6, छोटे पक्ष १६ (बविआ २, सपा २, एमआयएम २, प्रहार २, मनसे १, सीपीआय १, स्वाभीमानी १, आरएसपी १, स्वाभिमानी १, जनसुराज्य १, शेकाप १, क्रांतीकारी शेतकरी पक्ष १ ), अपक्ष १३, असे २८७ सदस्य विधानसभेत आहेत. शिवसेनेच्या रमेश लटके यांचे निधन झाल्याने एक जागा रिक्त आहे