पुणे-बंगळुरू महामार्गावर कंटेनरला कारची धडक, एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर कार आदळून ही दुर्घटना घडली. 

पुणे-बंगळूरू महामार्गावर (Pune-Banglore Highway) आज शनिवारी दुपारी भीषण अपघात (Accident) झाला. हा अपघात एवढा भीषण होता सांगली जिल्ह्यातील जयसिंगपूर (Jayasingpur) येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा या अपघातात मृत्यू (Five People Death) झाला आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर कार आदळून ही दुर्घटना घडली.

वाळवा तालुक्यातील कासेगाव येथील येवलेवाडी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल शर्यतजवळ हा अपघात घडला. आशियाई महामार्गाच्या कोल्हापूर दिशेने जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला कंटेनर थांबला होता. कोल्हापूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने कंटेनरला डाव्या बाजूस जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील पाचजण ठार झाले. अरिंजय आण्णासो शिरोटे, स्मिता अभिनंदन शिरोटे (३८), पूर्वा अभिनंदन शिरोटे (१४), सुनिशा अभिनंदन शिरोटे (०९), वीरेन अभिनंदन शिरोटे (०४) अशी मृतांची नावे आहेत.

या अपघातामुळे काहीकाळ वाहतुक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.