स्थलांतरित पक्षांचा मुक्काम वाढला

भातसा,तानसा,वैतरणा जलाशयाच्या काठावर देशी विदेशी पक्ष्यांचे थवे विसावले

शहापूर । परदेशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करुन भारतात हिवाळ्यातीच्या मोसमात येणारे विदेशी पक्ष्यांचे थवे भातसा,तानसा,वैतरणा या जलाशयांच्या काठावर विसावले आहेत.हिवाळ्यातील गारवा आणि आल्हाददायक वातावरणामुळे आपल्या मायदेशी परतण्याच्या लगबगीत असलेल्या पक्षांनी आपला मूड आता बदलला असून भारतात आणखी काही दिवस स्थलांतरित पक्ष्यांनी आपला मुक्काम वाढवला आहे.असे पक्षीनिरिक्षणातून निदर्शनास आलं आहे.असं पक्षीनिरीक्षक दामू धादवड यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील ताडोबा, नागझिरा, फनसाड, पेंच या अभयारण्यांन पाठोपाठ तानसा अभयारण्य भातसा,तानसा, वैतरणा जलाशय परिसर पक्षीनिरीक्षक आणि निसर्ग प्रेंमीच्या पसंतीस उतरलं आहे.हिवाळ्या मोसमात तानसा जलाशय परिसरात मुक्कामी असलेले विदेशी पक्षांचे थवे विशेष लक्ष वेधत आहेत.तलाव आणि आजुबाजूला असलेल्या घनदाट जंगलात स्थलांतरित दुर्मिळ पक्षी हे हिवाळ्याच्या चार महिने येथे वास्तव्यास असतात साधारण जानेवारीच्या दुसर्‍या आठवड्यात ते पुन्हा आपल्या मायदेशी परतण्यासाठी आपला प्रवास सुरु करतात.परंतु सध्या वातावरण कमालीचा बदल दिसत असून थंडी वाढल्याने हे गारेगार असे हिवाळ्यातील आल्हाददायक वातावरण पक्षांना पोषक वाटत असून वातावरणातील या बदलामुळे विदेशी पक्षांनी भारतात राहणे पसंत केले आहे.यामुळे त्यांचा संचार येथे दिसून येत आहे.जानेवारीच्या अखेरीपर्यंत हे विदेशी पक्षी तलावांच्या काठावर आपल्या नजरेस पडतील असे निसर्ग प्रेमी व पक्षी निरीक्षक दामू धादवड यांनी सांगितले.

समुद्री सिगल पक्षांचा मुक्त विहार शिवडी खाडी किनारी
समुद्री पक्षी किंवा सीगल हे पक्षी अमेरिका,युरोप या देशांमधून हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारतात येतात.ते हिवाळा संपेपर्यंत म्हणजे साधारणत जानेवारीच्या अखेरीस हे पक्षी पुन्हा आपल्या मायदेशी परतणार हिवाळ्यातील आल्हाददायक वातावरणामुळे हे सिंगल पक्षी शिवडी किनारी मोठ्या प्रमाणावर नजरेस पडत आहेत.आफ्रिका, युरोप, आशिया खंडातुन भारतात येणारे स्थलांतरित पक्षी फ्लेमिंगो म्हणजेच रोहित पक्षी हिवाळा सुरू होताच पुण्यातील उजनी धरण, औरंगाबाद येथील जायकवाडी धरण परिसर त्याचप्रमाणे मुंबई मधील शिवडी खाडीकिनारी हे पक्षी आपल्याला पाहायला मिळत आहेत.असे पक्षी निरीक्षक दामू धादवड यांनी माहिती देताना सांगितले.ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्य व तलावांच्या परिसरात एकुण 212 पक्ष्यांच्या विविध प्रजाती आहेत.त्यातील 55 पक्षी तानसा तलावाच्या आसर्‍यावर राहत आहेत.यात झाडावर वास्तव्य करणारे 126 पक्षी आहेत अशी माहिती तानसा वन्यजीव विभागातून मिळाली आहे.

हिवाळ्या मोसमातील पक्षी हे निसर्ग प्रेमी व पक्षी निरिक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.शहापूर तालुक्यातील घनदाट जंगलात पावश्या, भृंगराज, कोतवाल, कोकीळ, हळदया, नाचन, घुबड, पिंगळ्या, खारीक टक्कोचोर, सुतार,टिटवी खंड्या, दयाळ, लाव्हे, तिथर, शिकरा, धोबी, पित्ता, गरुड, घार, सादबहीणी, करकोचा, पोपट, मोर आदि विविध पक्षी येथे आढळतात.काही दुर्मिळ असलेले स्थलांतरीत विदेशी पक्षी हिवाळ्यात भातसा, तानसा, वैतरणा, या परिसरातील वनराईत मुक्कामी आहेत.जलाशय अभयारण्यात या पक्ष्यांचे सर्वत्र भ्रमण सुरु असते.वेगवेगळ्या प्रकारे आवाज करणार्‍या लाल पिवळ्या काळ्या निळ्या हिरव्या रंगाचे हे पक्षी सर्वांनचेच आता लक्ष वेधून घेत आहेत. या पक्ष्यांच्या सवयी आवाज खाद्य शिकारीच्या पध्दती राहण्याची ठिकाणे घरटी वेगवेगळी पहावयास मिळतात.