Friday, April 19, 2024
घरमानिनीबांदेकर भावंडांची चाकावरची खाद्य'संपदा', गृहउद्योगातून बहरली फूड ट्रकवरील लज्जतदार मेजवानी

बांदेकर भावंडांची चाकावरची खाद्य’संपदा’, गृहउद्योगातून बहरली फूड ट्रकवरील लज्जतदार मेजवानी

Subscribe

संपदा कॉलेजमध्ये असताना मुंबई स्टॉक होम एक्सजेंच प्रोग्रामची भाग होती. त्याअंतर्गत त्यांना अभ्यासासाठी युरोप देशांत नेण्यात आलं होतं. या युरोपिय देशांमध्ये फूड ट्रक संकल्पनेला चांगला प्रतिसाद आहे. तिथे अनेक फूड ट्रक प्रसिद्ध आहेत. आता हीच संकल्पना भारताही रुजतेय.

मुंबई – आईच्या छोट्या गृहउद्योगातून प्रेरणा घेत ऐन लॉकडाऊन काळात संपदा आणि सर्वेश बांदेकर या बहिण भावाच्या जोडीने फूड ट्रक चालू करण्याचा निर्णय घेतला. वेळप्रसंगी रस्त्यावर उभं राहत ग्राहकांना आवाज देत खवय्यांना स्टॉलपर्यंत आणलं. सोशल मीडिया, व्लॉगिंगच्या माध्यमातून हटके पद्धतीने जाहिरात करत आता जॅक अॅण्ड जिल फूड ट्रकला खवय्यांचा लज्जतदार प्रतिसाद मिळतोय. हॉटेलिंग क्षेत्रातलं तंत्रशुद्ध शिक्षण नसतानाही सोशल मीडियाच्या माध्यमातून संपदाने आपला व्यवसाय चांगलाच वाढवला आहे. माय महानगरने तिची दखल घेत तिचा हा प्रवास तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय.

संपदा बांदेकर आणि सर्वेश बांदेकर या दोघांनी एकत्र येत जॅक अॅण्ड जिल या फूड ट्रकची निर्मिती केली. भायखळा स्थानकाच्या पश्चिमेला अवघ्या दोन मिनिटांच्या अंतरावर हे फूड ट्रक आहे. ज्या काळात लोकांच्या नोकऱ्या जात होत्या, व्यवसाय ठप्प होत होते, त्या लॉकडाऊन काळात या बहिण भावाच्या जोडीने पुढाकार घेत फूड ट्रक चालू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला या फूड ट्रकला अत्यल्प प्रतिसाद होता. पण संपदाने लढवलेल्या युक्तीमुळे आता जॅक अॅण्ड जिल खवय्यांच्या पसंतीस उतरत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नारी शक्तीचा विजय असो! महिला वैमानिकाने उडवले लढाऊ विमान; भारत-चीन सीमेवर यशस्वी उड्डाण

संपदाने मुंबईतून बॅचलर ऑफ मास मीडियाचं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर काही वर्ष तिने पुण्यात काम केलं. संपदाची आई पूर्वीपासूनच लाडू, बिर्याणी, पाव भाजी आदी पदार्थांच्या ऑर्डर घेत होती. यामाध्यमातून त्यांचा छोटासा गृहद्योग सुरू होता. या गृहद्योगाला संपदाने सोशल मीडियाच्या माध्यमातून मार्केट मिळवून दिलं. लॉकडाऊन काळात तिने तिच्या आईने बनवलेल्या डिंकाच्या लाडूची जाहिरात फेसबूकद्वारे केली. त्या जाहिरातीला तुफान प्रतिसाद मिळाला. एकाच दिवशी ८० ऑर्डर्स आल्या. त्यानंतर ऑर्डर्सची संख्या वाढत गेली. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याकरता काही महिलांनाही कामाला ठेवावं लागलं. त्यातूनच आजूबाजूच्या परिसरातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली.

- Advertisement -


संपदा कॉलेजमध्ये असताना मुंबई स्टॉक होम एक्सजेंच प्रोग्रामची भाग होती. त्याअंतर्गत त्यांना अभ्यासासाठी युरोप देशांत नेण्यात आलं होतं. या युरोपिय देशांमध्ये फूड ट्रक संकल्पनेला चांगला प्रतिसाद आहे. तिथे अनेक फूड ट्रक प्रसिद्ध आहेत. आता हीच संकल्पना भारताही रुजतेय.

‘हॉटेलिंग क्षेत्रात फूड ट्रकचा ट्रेंड निर्माण झालाय. या ट्रेंडचा आम्हालाही भाग व्हायचं होतं. शिवाय रेस्टॉरंट उभारण्यासाठी पुरेसं भांडवलही नव्हतं, त्यामुळे फूड ट्रक ही संकल्पना आजच्या काळातील आणि खिशाला परवडणारी संकल्पना असल्याने आम्ही फूड ट्रक टाकण्याचं ठरवलं,’ असं संपदा म्हणाली.

घरातूनच गृहद्योगाचं बाळकडू मिळालं असलं तरी हॉटेलिंग क्षेत्राबाबत माझ्याकडे काहीच अनुभव नव्हता. पण तरीही या क्षेत्रात उतरायचं ठरवलं. सुरुवातीला ‘जॅक अॅण्ड जिल’ला लोकांचा प्रतिसाद अगदी अल्प होता. त्यात कोरोनामुळे कोणी फारसं बाहेर पडत नसतं. अशावेळी ग्राहकांना हाक मारून, आवाज देऊन त्यांना आम्ही आमच्या ट्रकपर्यंत बोलवत होतो. मग नंतर आम्ही सोशल मीडियावर कॉन्टेट मार्केटिंग सुरू केलं. अनेक फूड व्लॉगर्सना आमच्याकडे बोलावून घेतलं. त्यांच्यामुळे आमची चांगली जाहिरात झाली. व्हिडीओ पाहून खवय्ये आमच्याकडे येऊ लागले. आता आम्हाला फोन करूनही लोक ऑर्डर्स देतात, असं संपदाने सांगितलं.

हेही वाचा आई-वडिलांनी मुलींना विश्वास द्यायला हवा : जलसंपदा अधीक्षक अलका अहिरराव

ग्राहकांशी कसं बोलावं इथपासून ते कायदेशीर प्रक्रिया कशी पार पाडावी याबाबत आम्हाला हळूहळू माहिती होत गेली. फूड ट्रक सुरू झाल्यापासून येणारा प्रत्येक दिवस आम्हाला काहीतरी नवं शिकवत होता, असं संपदा सांगते.

पुढे ती म्हणते की, ‘जॅक अॅण्ड जिलच्या किचनमध्ये मी फार लक्ष घालत नाही. माझा भाऊ उत्तम शेफ आहे. शिवाय आईची साथ असतेच. त्यामुळे त्यांनीच पदार्थ डिझाइन केले. किचनमधील सर्व काम भाऊ, आई आणि आमच्याकडे असलेले आमचे दोन सहकारी पाहतात. मी पूर्णवेळ सेल्स आणि मार्केटिंग पाहते. लोकांना आपल्यापर्यंत आणण्यासाठी काय काय करता येईल याचा रोज अभ्यास करते. यातूनच आम्हाला ऑनलाईन ऑर्डर प्राप्त होतात. आमचा व्यवसाय जीएसटी रजिस्टर नसतानाही कॉर्पोरेट ऑर्डर्सही आम्हाला मिळाल्या आहेत. स्विगी, झोमॅटोसारख्या अॅपद्वारे आम्हाला ऑर्डर्स प्राप्त होत असतात. त्यामुळे ऑफलाईन ग्राहकांची अभिरुची सांभाळताना आम्हाला ऑनलाईन ग्राहकांनाही तृप्त करावं लागतं.’

हेही वाचा – गरबा वर्कशॉपला महिला वर्गाचा तुफान प्रतिसाद

संपादाच्या फूड ट्रक परिसरात शाकाहारी पदार्थांची सेवा देणारे अधिक स्टॉल्स आहेत. पण नॉन व्हेज पदार्थांचे स्टॉल फार कमी होते. म्हणून तिने विभागाचा अभ्यास करून नॉन व्हेज पदार्थ ठेवण्याचं ठरवलं. पण, फूड ट्रक म्हटलं की जागेची अडसर निर्माण होते. अशावेळी भरमसाठ पदार्थ ठेवता येत नाहीत. त्यामुळे संपदाने कमीत कमी जागेत ग्राहकांना अधिकाधिक सेवा पुरवण्यासाठी पिझ्झा, बर्गर आणि शॉर्मासारखे पदार्थ ठेवले आहेत. तरुणांना आवडतील आणि परवडतील असे पदार्थ संपदाने ठेवले आहेत. जे पदार्थ स्नॅक्स कॉर्नर किंवा रेस्टॉरंट्समध्ये परवडत नाहीत, तेच पदार्थ जॅक अॅण्ड जिलमध्ये परवडतील अशा किंमतीत मिळतात. मात्र, पदार्थांची किंमत कमी करताना संपदा आणि तिच्या संपूर्ण टीमने चवीसोबत तडजोड केलेली नाही. एकदा गेलेला ग्राहक पुन्हा या फूड ट्रकवर जिभेचे चोचले पुरवायला जातोच.


ग्राहकांची अभिरुची जपण्यासाठी संपदाने आतापर्यंत दहावेळा मेन्यूकार्ड बदललं आहे. एखादा पदार्थ नाही चालला किंवा एखाद्या पदार्थामुळे उगीच पसारा होतोय असं वाटलं की तो पदार्थ काढून टाकला जातो. विभागाचा अभ्यास करून, ग्राहकांची चव ओळखून मेन्यू बनवले आणि बदलले जातात.

“कोणताही व्यवसाय करताना ग्राहकांना जपतानाच आपल्या कर्मचाऱ्यांनाही जपलं पाहिजे, तरच आपल्या व्यवसायात वृद्धी होते, असं मला कोणीतरी सांगितलं. तेच तत्व मी माझ्या व्यवसायात वापरत आले आहे. आपण कर्मचाऱ्यांना खूश ठेवलं की कर्मचारी आपल्या ग्राहकांना खूश करतात आणि ग्राहक खूश झाले की आपला व्यवसायही वाढतो. याचा मला नेहमी प्रत्यय येतोय,” असंही संपदा सांगत होती.

हेही वाचा – नवरात्रीत ट्राय करा उपवासाची चटपटीत मिसळ

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -

Manini