देवेंद्र फडणवीस यांना सक्तीची विश्रांती, कर्नाटक निवडणूक प्रचाराच्या दगदगीने प्रकृती बिघडली

ऐन उन्हाळ्यात झालेल्या या धावपळीने फडणवीसांच्या प्रकृतीवर याचा परिणाम झाला आहे. मंगळवारी त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही ते उपस्थित राहू शकले नाही.

Devendra fadnavis

मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सक्तीची विश्रांती घेत आहेत. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीलाही त्यांची गैरहजेरी होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे फडणवीसांनी मंगळवारचे सर्व कार्यक्रम तातडीने रद्द केले आणि त्यांनी सक्तीची विश्रांती घेतली आहे.

देवेंद्र फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रभर फिरत आहेत. विदर्भ, मुंबई, पुणे आणि नुकताच त्यांचा मराठवाडा दौरा झाला आहे. त्याआधी मे महिन्याच्या सुरुवातीला फडणवीस कर्नाटकाच्या दौऱ्यावर होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात ते व्यस्त होते. ऐन उन्हाळ्यात झालेल्या या धावपळीने फडणवीसांच्या प्रकृतीवर याचा परिणाम झाला आहे. मंगळवारी त्यांना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही ते उपस्थित राहू शकले नाही. यामुळे बैठक देखील लवकरच अटोपती घेण्यात आली.

महाराष्ट्रात सध्या धार्मिक तेढ आणि दंगलसदृष्य स्थिती काही जिल्ह्यांमध्ये आहे. अशात गृहमंत्री फडणवीस यांची प्रकृती बिघडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

भाजपाध्यक्ष दीड दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर
कर्नाटक हे मोठे राज्य हातातून गेल्यानतंर भाजप आता सावधगिरीने कामगिरी करत आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी आणि वातावरण निर्मितीचा भाग म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP National President J.P. Nadda) दीड दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. मुंबई भाजपने या कार्यक्रमाची आखणी केली आहे.
नड्डा यांच्या मुंबई दौऱ्यात फडणवीस उपस्थित राहाणार की नाही, याबद्ददली शंका व्यक्त केली जात आहे. फडणवसींच्या सोशल हँडलवर मात्र त्यांच्या प्रकृतीसंबंधी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

जे.पी. नड्डा बुधवारी मुंबईत येणार आहेत. त्यांच्या दौऱ्यासंबंधी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार (BJP Mumbai President Ashish Shelar) यांनी माहिती दिली,  मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी दिवसभर त्यांचे भरगच्च कार्यक्रम आहेत. त्यात घाटकोपर-मानखुर्द येथे केंद्रीय योजना लाभार्थ्यांशी संवाद, रमाबाई आंबेडकर नगर येथील पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या घरी दुपारचे जेवण घेणार आहेत. बोरिवली येथे बुद्धिवंतांशी संवाद, चारकोप येथे पन्ना प्रमुखांची भेट घेणार आहेत. मुंबई भाजप कार्यकर्त्यांशीही रात्री बैठक होणार आहे. रात्री सह्याद्री अतिथीगृहावर त्यांचा मुक्काम असणार आहे. त्यानंतर गुरुवारी ते पुण्याला रवाना होतील. या कार्यक्रमात फडणवीस सहभागी होणार आहे की नाही, याबद्दल शंका उपस्थित होत आहे.