पालिका सभागृह, समित्यांनी घेतलेल्या निर्णयात आयुक्तांकडून फेरफार; माजी महापौरांचा आरोप

भाजपने स्थायी समितीच्या खात्यारीत विविध पक्षांना देण्यात येणारा ६५० कोटी रुपयांच्या निधीबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. जोपर्यंत नवीन महापालिका गठीत होत नाही तोपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास भाजपने त्यावेळी कडाडून विरोध दर्शविला होता.

मुंबई महापालिका ( Mumbai Municipal Corporation) सभागृहाने विविध समित्यांनी घेतलेल्या प्रस्तवासंदर्भातील निर्णयात पालिका आयुक्त यांनी प्रशासक म्हणून परस्पर फेरफार करणे, निर्णयात बदल करून ते रद्द करणे योग्य नाही. आयुक्त यांनी विरोधकांच्या दबावाखाली येऊन असे निर्णय घेतल्याने पालिका सभागृह, समित्यांनी घेतलेल्या निर्णयाचा अवमान आहे, असा संताप माजी महापौर किशोरी पेडणेकर (Former mayor Kishori Pednekar) यांनी व्यक्त केला आहे.

आयुक्तांची चौकशी ?

किशोरी पेडणेकर यांनी याबाबत पालिका आयुक्त व प्रशासक इकबाल चहल (Iqbal Chahal) यांना माजी महापौरांनी तातडीने पत्र पाठवले असून जोपर्यंत नव्याने निवडणुका होऊन महापालिका गठीत होईपर्यंत अशा प्रकारे परस्पर निर्णय घेणे थांबवावे, अशी मागणी केली आहे. मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे (standing committee) तत्कालीन अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर आयकर खात्याची धाड (Income Tax Department raid) पडल्यावर त्यांनी कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यातच पालिका आयुक्त इकबाल चहल यांची चौकशी होण्याची शंका व्यक्त करण्यात येत होती.

६५० कोटींचा निधी रद्द

भाजपने स्थायी समितीच्या खात्यारीत विविध पक्षांना देण्यात येणारा ६५० कोटी रुपयांच्या निधीबाबतचा निर्णय रद्द करण्याची मागणी लावून धरली होती. जोपर्यंत नवीन महापालिका गठीत होत नाही तोपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास भाजपने त्यावेळी कडाडून विरोध दर्शविला होता. योगायोगाने आयुक्त यांनाही भाजपची भूमिका व मागणी पटली असावी. त्यांनी ६५० कोटींच्या निधींबाबतचा निर्णयही आपल्या अधिकारात रद्द केला. दरम्यान, आयुक्त यांनी दिल्लीची वारी केली. त्यानंतर आयुक्त यांच्या भाजपचे नेते आशिष शेलार यांच्याशी विविध विषयाच्या अनुषंगाने दोन वेळा बैठका झाल्या. आता आयुक्त यांनी कडक भूमिका घेतली आहे. नालेसफाईच्या कामांत दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारालाही इंगा दाखवत नोटीस बजावली.

परस्पर निर्णय घेऊ नयेत
मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्च रोजी संपुष्टात आली. त्यामुळे महापौर, विविध समिती अध्यक्ष, गटनेते पद हे संपुष्टात आले. मात्र २०१७ ते २०२२ पर्यंत पाच वर्षांच्या कालखंडात पालिका सभागृह व विविध समित्यांनी मंजूर केलेले प्रस्ताव व निर्णयामध्ये पालिका आयुक्त आता फेरफार करीत आहेत, असा आरोप माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पालिका आयुक्त व प्रशासक इकबाल चहल यांच्यावर केला आहे. विरोधकांच्या दबावाला बळी पडून आयुक्त हे निर्णय घेत आहेत. त्यामुळे पालिका सभागृह व विविध समित्या यांचा अवमान होत आहे. जोपर्यंत नव्याने पालिका निवडणूक होऊन नवीन महापालिका गठीत होत नाही, तोपर्यंत आयुक्तांनी परस्पर असे निर्णय घेऊ नयेत, अशा शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.