Monday, September 27, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण करून दीड लाखांना विकले

दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण करून दीड लाखांना विकले

महिलेसह चौघांना अटक व कोठडी; मुलाची सुखरुप सुटका

Related Story

- Advertisement -

वांद्रे येथे एका दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण करून त्याची विक्री केल्याप्रकरणी एका महिलेसह चौघांना वांद्रे पोलिसांनी अटक केली. फरहाना कुर्बान शेख, परंदास गुंडेली, नक्का राजू नरसिंहा आणि विशिरीकापल्या राजाराव धर्माराव अशी या चौघांची नावे आहेत. अटकेनंतर या चौघांनाही वांद्रे येथील लोकल कोर्टाने बुधवार 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील फरहाना तिने या मुलाची परंदासला दीड लाखांना तर परंदासने इतर दोघांना 1 लाख 65 लाख रुपयांना विक्री केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या मुलाची तेलंगणा येथून सुखरुप सुटका करून त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

40 वर्षांची तक्रारदार महिला ही वांद्रे परिसरात राहत असून तिथेच ती भीक मागण्याचे काम करते. तिला दहा महिन्यांचा एक मुलगा आहे. 31 ऑगस्टला ती तिच्या मुलासोबत वांद्रे येथील एस. व्ही रोड, वाहतूक चौकीजवळ झोपली होती. रात्री उशिरा अज्ञात व्यक्तीने तिच्या दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण केले होते. दुसर्‍या दिवशी हा प्रकार उघडकीस येताच तिने वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली होती. हा तपास सुरू असताना हेमंत फड, आनंदराव काशिद, महेश कदम, एकता पवार व अन्य पोलीस पथकाला या महिलेकडे एक महिला नेहमी जेवण घेऊन येत होती. तिचाच या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आले होते. त्यामुळे तिचा पोलिसांनी शोध सुरू केला होता. पोलिसांनी फरहाना शेख नावाच्या महिलेला वांद्रे येथून अटक केली.

- Advertisement -

चौकशीत तिनेच या मुलाचे अपहरण करून त्याची परंदास याला दीड लाखांना विक्री केल्याची कबुली दिली. त्यानंतर या पथकाने परंदासला खार परिसरातून अटक केली. त्याने या मुलाला तेलंगणा राज्यात राहणार्‍या नक्का आणि विशिरीकापल्या यांना विकल्याचे सांगितले. या कबुलीनंतर या पथकाने तेलंगणा येथून दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्या तावडीतून या मुलाची सुखरुप सुटका केली. या दोघांनाही नंतर पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते.

अपहरणासह अन्य भादंवि कलमांतर्गत त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून नंतर त्यांना वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी 1 लाख 85 हजार रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाईल, आधारकार्ड आणि इतर दस्तावेज जप्त केला आहे. या मुलाची 3 लाख 15 हजार रुपयांमध्ये सौदा झाला होता. मात्र गुन्हा दाखल होताच कुठलाही पुरावा नसताना या पथकाने चारही आरोपींना अटक करून अपहरण झालेल्या मुलाची सुखरुप सुटका केली. या मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी वांद्रे पोलिसांचे कौतुक केले आहे.

- Advertisement -