घरमुंबईअर्ध्या तासाच्या प्रवासासाठी साडेचार तास

अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी साडेचार तास

Subscribe

तुबंलेल्या पाण्यामुळे प्रवाशांचे हाल

पावसाने सलग दोन दिवस केलेल्या बॅटिंगचा फटका बुधवारी नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला. रुळांवर व रस्त्यांवर विविध ठिकाणी पाणी साचल्याने मुंबईची लाईफलाईन ठप्प झाली. त्यामुळे नागरिकांना इच्छितस्थळी पोहचणे अवघड झाले होते. ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने टॅक्सीने बीकेसीतून विक्रोळीला निघालेल्या एका प्रवाशाला अर्ध्या तासाच्या मार्गासाठी तब्बल साडेचार तास लागले. पाणी तुंबल्याने त्यांना बीकेसी, सायनहून विक्रोळी असे न येता बीकेसी, कुर्ला, सांताक्रुझ, अंधेरी, पवई मार्गे कांजूरमार्गाहून विक्रोळी असा प्रवास करावा लागला. या प्रवासात त्यांचा वेळ व पैसा असे दोन्हीही गेले.
अमेरिकेला जाण्यासाठी पासपोर्ट काढण्यासाठीची प्रक्रिया करण्यासाठी विक्रोळीतील एक दाम्पत्य आपल्या भाच्यासोबत बीकेसी येथील पासपोर्ट कार्यालयात सकाळीच आले होते. पासपोर्टची प्रक्रिया पूर्ण करून 12 वाजताच्या सुमारास विक्रोळीकडे येण्यासाठी निघाले. परंतु सायनला पाणी तुंबलेले असल्याने कोणीही टॅक्सीवाला येण्यास तयार नव्हता. पाच ते सहा टॅक्सी सोडल्यानंतर अखेर हे दाम्पत्य रईशुद्दीन खान (वय 55) यांच्या टॅक्सीमध्ये बसले. पण खान यांनीही त्यांना सायनला पाणी साचल्याने तिकडून जाणे शक्य नसल्याचे सांगितले. यावर त्यांनी जसे शक्य होईल तसे जाऊ, असे खान यांना सांगितले. सायन मार्ग बंद असल्याने खान यांना कुर्ला मार्गे टॅक्सी नेण्यास दाम्पत्याच्या भाच्याने सांगितले. त्यानुसार खान यांनी टॅक्सी कुर्ल्या मार्गे नेली. परंतु कुर्ल्यात आल्यावर तेथेही पाणी साचले असल्याने पुढे जाणे शक्य नव्हते.

पाणी तुंबले असल्याने पोलिसांनी पुढे जाण्यापासून त्यांना रोखले. त्यामुळे दाम्पत्याच्या भाच्याने टॅक्सी कलिना मार्गे सांताक्रुझला नेण्यास सांगितली. परंतु तेथेही पाणी तुंबल्याने त्यांनी खान यांना टॅक्सी अंधेरीला नेण्यास सांगितली. खान यांनी एलबीएस मार्गे अंधेरी गाठले. त्यांनतर जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरून टॅक्सी नेली. परंतु अनेक ठिकाणी पाणी साचले असल्याने त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. वाहतूक कोंडी व तुंबलेले पाणी यातून मार्ग काढत टॅक्सी पवई मार्गे विक्रोळीला पोहचली. या प्रवासासाठी त्यांना तब्बल साडेचार तास लागले. तसेच 750 रुपये मोजावे लागले, अशी माहिती टॅक्सीचालक रईशुद्दीन खान यांनी दिली. पाणी तुंबल्याने बीकेसी ते विक्रोळी प्रवासासाठी विक्रोळीतील दाम्पत्याला अर्धा तासासाठी तब्बल साडेचार तास लागले. तर 200 रुपये भाड्याऐवजी 750 रुपये मोजावे लागल्याची माहिती टॅक्सीचालक रईशुद्दीन खान यांनी दिली. भाडे जास्त झाल्याने खान यांनी भाडे कमी देण्यास त्या दाम्पत्याला सांगितले. परंतु त्या दाम्पत्याच्या भाच्याने ‘पाणी तुंबले आहे, त्याला तुम्ही काय करू शकता’ असे सांगत त्यांना पूर्ण भाडे देल्याचे खान यांनी सांगितले.

- Advertisement -

रेल्वे बंद झाल्याने अनेकांनी टॅक्सी, रिक्षा व बसला प्राधान्य दिले. अशा घटनेमध्ये दरवर्षी टॅक्सी व रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट केली जाते. परंतु विक्रोळीतील दाम्पत्याला करावे लागलेल्या प्रवासाचा व त्यांना बसलेल्या आर्थिक भूर्दंडाबाबत खान यांनी खंत व्यक्त करत माणुसकीचे दर्शन घडवले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -