घरमुंबईभिवंडीत पेपरफुटी प्रकरणी चौथा शिक्षक अटकेत

भिवंडीत पेपरफुटी प्रकरणी चौथा शिक्षक अटकेत

Subscribe

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीचे पेपर भिवंडीत फुटल्या प्रकरणी पोलीसांनी काल रविवार दि. २४ रोजी रात्री उशीरा चौथ्या शिक्षकाला अटक केली आहे. आज दि. २५ रोजी दुपारी त्याला कोर्टामध्ये हजर केले असून, त्याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीचे पेपर भिवंडीत फुटल्या प्रकरणी पोलीसांनी काल रविवार दि. २४ रोजी रात्री उशीरा एका कोचिंग क्लासच्या शिक्षकास अटक केली असून, आता पर्यंत पोलीसांनी एकूण चार जणांना अटक केली आहे. अजूनही पोलीस या गुन्ह्यातील प्रमुख आरोपीपर्यंत पाच दिवस झाले तरी पोहचू शकत नसल्यामुळे पोलीस तपासाबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे. नावीद मोहम्मद मुलीन अन्सारी(२७) असे अटक केलेल्या कोचिंग क्लासमधील शिक्षकाचे नाव आहे.

२९ मार्चर्पयंत पोलीस कोठडी

नावीद मोहम्मद मुलीन अन्सारी हा कोटरगेट येथे राहत असुन शहरातील धामणकर नाका, पटेल कंपाउंड येथील करिअर एज्युकेशन क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम करीत असे. या कोचिंग क्लासमधील हा तिसरा शिक्षक पोलीसांनी अटक केला असुन यापुर्वी कोचिंग क्लासमधील दोन शिक्षक आणि काकतीया इंग्लिश हायस्कुलमधील एक शिक्षक असे तीन शिक्षक पोलीसांनी अटक केली आहे. त्यामुळे अटक झालेल्या शिक्षकांची संख्या चार झाली आहे. कामतघर येथे काकतीया इंग्लिश हायस्कुल असुन त्यामधील शिक्षकास अटक केल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांनी कोणतीही भूमिका पोलीसांकडे स्पष्ट केली नाही. तर अटक केलेला शिक्षक शाळेत कोणत्या पदावर आहे, याचीही पोलीसांनी खात्री केलेली नाही. दरम्यान, काल रात्री दि.२४ रोजी अटक केलेल्या नावीद अन्सारी याला आज दि. २५ रोजी दुपारी कोर्टामध्ये हजर केले असता त्याला २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

खुद्द पोलीस आता संशयाच्या भोवऱ्यात

भिवंडी शहरात दहावी परीक्षा पेपर फुटीची चर्चा ११ मार्च पासून सुरु झाली आहे. त्याबाबत एका स्वयंसेवी संस्थेने परीक्षा मंडळाकडे १४ मार्च रोजी तक्रार केली होती. परंतु त्यानंतर सुध्दा पेपर फुटीच्या घटना सुरूच होत्या. पेपर फुटीकडे परीक्षा मंडळातील अधिकारी सोयीस्कर पणे दुर्लक्ष करीत राहिले आहेत. परंतु याच दरम्यान २० मार्च रोजी परीक्षा केंद्रा बाहेर विद्यार्थिनींना शिक्षकांनी रंगेहात पकडल्यानंतर परीक्षा मंडळास जाग येऊन घाईघाईने प्रथम शहर पोलीस ठाणे व त्यानंतर काल्हेर येथील पी.डी. टावरे विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश भोईर यांनी नारपोली येथे दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरवातीपासून स्थानिक पोलीस या गुन्ह्या बाबत गुप्तता बाळगून पत्रकारांना तपासाची माहिती देण्यास नकार देत होते. तपास करीत असल्याचे सांगत या प्रकरणी अजूनपर्यंत अटक केलेल्या चार पैकी तीन जण हे खाजगी शिकवणी कोचिंग क्लास चालक होते. तर त्यातील एक शाळेतील शिक्षक आहे. परंतु हे सर्व षडयंत्र ज्या परीक्षा केंद्रातील शिक्षकांकडून घडविले जात होते त्यांना पकडण्यासाठी पोलिसांना लागणारा वेळेमुळे खुद्द पोलीस आता संशयाच्या भोवऱ्यात येत आहेत. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा यांच्याकडे द्यावा. जेणे करून दोन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत लवकर तपास होऊन, आरोपींच्या हातात बेड्या पडतील, अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे .

नागरिकांनी उपस्थित केले प्रश्न 

परीक्षा मंडळाच्या नियमानुसार परीक्षा केंद्रातील जबाबदार शिक्षक मुख्य केंद्रावर जाऊन प्रश्नपत्रिका ताब्यात घेतात. त्यावेळी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्तासाठी त्यांच्या सोबत असतो. मात्र पोलीस बंदोबस्त असूनही या प्रश्नपत्रिकांच्या गठ्ठयाचे सील तोडून त्यातील प्रश्नपत्रिकांचे मोबाईल वरून फोटो काढले गेले. तसेच ते फोटो आर्थिक व्यवहारातील संबंधितांना पाठवून, ते विद्यार्थ्यांपर्यंत व्हाट्सअप मार्फत पोहचविले जात असताना जबाबदार शिक्षकासोबत असणारे पोलीस कर्मचारी यांचे दुर्लक्ष कसे झाले हे सुध्दा तपासून त्यांच्यावर हि कारवाई होणे हे गरजेचे आहे. दोन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासात सुसूत्रता नसल्याने जाणूनबुजून या कारवाईत दिरंगाई करून टोलवाटोलवी सुरु असल्याने या गुन्ह्यातील मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकणार कसा? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे .

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -