घरमुंबईजे. जे. रुग्णालयातून चार वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण

जे. जे. रुग्णालयातून चार वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण

Subscribe

महिलेस कोठडी; मूल होत नसल्याचे अपहरण केल्याची कबुली

जे. जे रुग्णालयातून एका चार वर्षांच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी शुक्रवारी अटक केलेल्या शबनम शेख या महिलेला शनिवारी दुपारी लोकल कोर्टाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिच्याकडून अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यात आली असून त्याला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे. मूल होत नसल्याने तिने या मुलाचे अपहरण केल्याचे एसीपी अविनाश धर्माधिकारी यांनी सांगितले.

पूनम यादव ही महिला डोंगरी येथे राहत असून तिला कमलेश नावाचा एक चार वर्षांचा मुलगा आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ती जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी आली होती. ती रांगेत नाव रजिस्टर करण्यासाठी उभी होती, यावेळी कमलेश हा तिथे खेळत होता. काही वेळानंतर तिला कमलेश तिथे नसल्याचे दिसून आले. तिने त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र कमलेश कुठेच सापडला नाही, त्यामुळे तिने जे. जे. मार्ग पोलिसांत कमलेशच्या मिसिंगची तक्रार केली होती. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला होता. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.

- Advertisement -

एसीपी अविनाश धर्माधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव भोळे यांच्या पथकातील सुतार, घेवडेकर, गादेकर व गुन्हे शाखेच्या पथकाने शोध सुरु केला असता सीसीटिव्ही फुटेजमध्ये कमलेशला एक महिला घेऊन जात असल्याचे दिसून आले. तिचा शोध सुरु असताना शबनम शेख हिला रे रोड येथून पोलिसांनी ताब्यात घेतले, चौकशीत तिनेच कमलेशचे अपहरण केल्याची कबुली दिली. त्यानंतर तिच्या तावडीतून पोलिसांनी कमलेशची सुखरुप सुटका केली. पोलीस तपासात शबनमला मूल होत नसल्याने तिने कमलेशचे अपहरण केल्याची कबुली दिली. अपहरणाच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिला शनिवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी तिला कोर्टाने सोमवार 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -