घरमुंबईबांधकाम मजुरांना मोफत आरोग्य सुविधा

बांधकाम मजुरांना मोफत आरोग्य सुविधा

Subscribe

बांधकाम व्यवसायात काम करणार्‍या मजुरांना मोठ्या प्रमाणावर आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. पूर्णवेळ सिमेंट आणि इतर बांधकाम साहित्याच्या संपर्कात राहिल्यामुळे या मजुरांना श्वसनाचे आजार होत असतात. वजन उचलण्याच्या कामामुळे अनेक शारीरिक व्याधीदेखील जडतात. त्यामुळे अशा मजुरांचे सरासरी आयुष्य कमी होत असल्याचे देखील दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर अशा मजुरांसाठी आरोग्यविषयक तपासणीची नवी सुविधा आता उपलब्ध झाली आहे. विशेष म्हणजे ही तपासणी मोफत केली जाणार आहे. बोर्ड ऑफ कन्स्ट्रक्शन वर्कर्सतर्फे एचएलएल लाईफ केअर लिमिटेड आणि हिंदलॅब्जच्या मदतीने या सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्यामुळे मजुरांच्या आरोग्याचा स्तर उंचावण्यास नक्कीच मदत होईल.

एचएलएलतर्फे करण्यात येणार्‍या या सर्व्हिसमध्ये शारीरिक तपासणी, फुफ्फुस तपासणी, आवाजाची तपासणी, रक्त तपासणी, साखरेचे प्रमाण, यकृत तपासणी, मलेरिया, इएसआर, हिमोग्लोबिन, टी ३-टी ४ टीएसएच तपासणी अशा विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जातील. यासाठी सर्व बांधकाम मजुरांना इलेक्ट्रॉनिक हेल्थ कार्ड देण्यात येईल. या कार्डमध्ये त्या मजुराची आरोग्यविषयक माहिती साठवून ठेवली जाईल, जी कधीही आणि कुठेही पाहाता येईल. या कार्डांवर संबंधित मजुराचा फोटो देखील असेल. याशिवाय, ज्या मजुरांना गंभीर आजार असल्याचे तपासणीमध्ये दिसून येईल, त्यांना जवळच्या सरकारी आरोग्य केंद्रावर नेण्यात येईल. रुग्णांच्या सोयीसाठी कॉल सेंटर आणि हेल्पलाईन देखील सुरू करण्यात आली आहे. बोर्ड ऑफ कन्स्ट्रक्शनकडून पुरवल्या जाणार्‍या या सुविधांमुळे मजुरांच्या आरोग्यामध्ये निश्चितच सकारात्मक बदल घडू शकतात.

- Advertisement -

मोफत आरोग्य सुविधा पुरवणारे हे कॅम्प बांधकाम मजुरांना कमीत कमी प्रवास करावा लागेल इतक्या अंतरावर किंवा शक्य झाल्यास थेट बांधकामाच्या ठिकाणीच उभे केले जातील. जर कॅम्प लांब असतील, तर मजुरांच्या नेण्याची आणि आणण्याची सोय केली जाईल. अशा केंद्रांमध्ये बसण्याची व्यवस्था आणि स्टॉल असतील. असे कॅम्प उभारण्याआधी त्याची प्रसारमाध्यमांत रितसर जाहिरात देखील केली जाईल. ज्यांची नोंदणी आधी होऊ शकली नाही, अशा मजुरांना थेट केंद्रावर देखील नोंदणी करता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -