घरमुंबईएसटी बसगाड्यांतील मोफत इंटरनेट सुविधा कोलमडली

एसटी बसगाड्यांतील मोफत इंटरनेट सुविधा कोलमडली

Subscribe

४० टक्क्यांहून अधिक वायफाय बॉक्स बंद

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने मोठा गाजावाजा करत एसटी बसगाड्यांमध्ये प्रवाशांसाठी निःशुल्क मोफत इंटरनेट सुविधा पुरवण्यात आल्याचे जाहीर केले होते. मात्र आता ही सुविधा पूर्णत: कोलमडली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कारण बसगाड्यांमध्ये बसवलेले वायफाय बॉक्स बंद आहेत. सुमारे १७ हजार हजार बस गाड्यांमध्ये वायफायचे बॉक्स बसवण्यात आले आहेत. मात्र त्यापैकी ४० टक्क्यांहून अधिक बॉक्स बंद आहेत. त्यामुळे आता हे बॉक्स बसगाड्यांमधून काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसगाड्यांमधून प्रवास करताना प्रवाशांना प्रवास कंटाळवाना वाटू नये, यासाठी महामंडळाने बसगाड्यांमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली. एसटी महामंडळाच्या सुमारे १८ हजार ५०० एसटी गाड्या आहे. त्यापैकी १७ हजार बसगाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मात्र अनेक बसगाड्यांमधील वायफायचे बॉक्स कार्यरत नाहीत, या व्यतिरिक्त कनेक्टीव्हीटी नसल्यामुळे सुविधेचा वापर करता येत नाही, अशा तक्रारी प्रवाशांकडून होत आहे. मात्र या प्रकरणी एसटी महामंडळाने लागलीच हात झटकले आहेत.

- Advertisement -

यंत्र मीडिया सोल्युशन या कंपनीद्वारे एसटीच्या बसगाड्यांमध्ये वायफायचे बॉक्स बसवण्यात आले आहेत. यांची देखभाल नियमित होत नसल्याने हे वायफाय बॉक्स नादुरुस्त बनले. अशा नादुरुस्त वायफाय बॉक्सची संख्या ४० टक्क्यांपेक्षा अधिक असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले. सोबतच सध्या खासगी मोबाईल कंपन्या अनलिमिटेड डेटा नेटपॅक देत असल्यामुळे एसटीच्या वायफायची गरज भासत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे एसटी बसगाड्यांमधील मोफत वायफाय सुविधा कोमात गेली असल्याचे चित्र आहे. यासंबंधी एसटी महामंडळाकडे आणि कंपनीला संपर्क केला असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही.

महामंडळाकडून उडवाउडवीची उत्तरे
मोफत वायफाय सुविधेबाबत एसटी महामंडळाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता त्यांनी बसगाड्यांमध्ये वायफाय बॉक्स बसविलेले आहेत. परंतु यातील कोणकोणत्या बसगाड्यांमध्ये ही सुविधा सुरू आहे किंवा त्यांची सद्यपरिस्थिती काय आहे, याबद्दलची माहिती संबंधित कंपनीला माहीत असते. याबाबत महामंडळ कोणतीही माहिती ठेवत नाही. या प्रकरणी आम्ही ही इंटरनेट सुविधा पुरवणार्‍या संंबंधित कंपनीला विचारले असता, आम्हाला अशी माहिती देता येत नाही. तुम्ही एसटी महामंडळाला विचारा असे उत्तर दिले.

- Advertisement -

वायफाय सुविधेविषयी प्रवाशांमध्ये नाराजी
एसटीची प्रवासी संख्या वाढविण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध उपयोजना राबविल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून एसटी गाड्यांमध्ये प्रवासादरम्यान मनोरंजन करण्यासाठी वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार ही सुविधा देण्यासाठी महामंडळाकडून मुंबई येथील कांगो यंत्र मीडिया कंपनीबरोबर करारही केला होता. त्यानुसार आतापर्यंत १७ हजार एसटी बसगाड्यांमध्ये वायफाय बॉक्स बसविण्यात आले, मात्र या वायफाय बॉक्समध्ये सतत तांत्रिक बिघाड होत असल्यामुळे प्रवाशांनी एसटीच्या या वायफाय सुविधेकडे पाठ फिरवली आहे. सोबतच एसटीच्या या कारभारावर आपली नाराजी व्यक्त केली.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -