घरट्रेंडिंगमृत व्यक्तीकडून फेसबुकवर आली फ्रेंड रिक्वेस्ट; मेसेजवर केली ही मागणी

मृत व्यक्तीकडून फेसबुकवर आली फ्रेंड रिक्वेस्ट; मेसेजवर केली ही मागणी

Subscribe

दोनच दिवसांपूर्वी निधन झालेल्या व्यक्तीकडून अनेकांच्या फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आल्याच्या वृत्ताने ठाण्यात एकच खळबळ उडवून दिली होती. परंतु फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आलेले खाते बनावट असल्याचा खुलासा होताच अनेकांचा जीव भांड्यात पडला. बनावट खात्यावरून पाठवण्यात आलेल्या व्यक्तीने रिक्वेस्ट मान्य करणाऱ्यांकडे पैशांची मदत मागितली होती, असे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्यातील एका सहकारी बँकेत सह व्यवस्थापक म्हणून काम करणारे ५५ वर्षीय अजित रानडे यांचे ७ जुलै रोजी निधन झाले होते. त्यानंतर दोनच दिवसांनी ९ जुलै रोजी अजित रानडे या नावाने नातेवाईक, मित्र मंडळी तसेच बँकेतील त्यांचे सहकारी यांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. अजित रानडे यांचे दोनच दिवसांपूर्वी निधन झाले असल्याचे अनेकांना माहीत होते, त्यामुळे या फ्रेंड रिक्वेस्टची चर्चा ठाणे तसेच आजूबाजूच्या परिसरात रंगली. अनेकांनी तर अजित रानडे यांचे भाऊ तसेच इतर नातेवाईकांना फोन करून अजित रानडे यांचे खरोखर निधन झाले का? ही देखील चौकशी केली.

- Advertisement -

ही फ्रेंड रिक्वेस्ट केवळ मित्र मंडळी तसेच नातेवाईकांनाच नाही तर निधन झालेले अजित रानडे यांच्या मुलीला, भावाला देखील आली होती. कोणीतरी अजित रानडे यांच्या नावाचे बनावट फेसबुक खाते तयार करून सर्वांना एकाच वेळी रिक्वेस्ट पाठवत असल्याचे अजित रानडे यांचा भाऊ मिलिंद आणि पुतण्या विभव यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ फेसबुकला तक्रार पत्र लिहून मेल केला. हे बनावट खाते बंद करण्याची विनंती केली. या दरम्यान अनेक नातेवाईक आणि मित्र सहकारी यांनी अजित रानडे यांच्या नावाने आलेली रिक्वेस्ट मान्य केली असता त्यांना एक मेल आला त्यात त्यांना पैशांची नितांत गरज असून मदत करावी, असा मेल पाठवून या मेलवर पेटीएम खात्याची माहिती देण्यात आली होती. मात्र अनेकांनी अजित रानडे यांच्या घरी फोन करून हे खरे आहे का? म्हणून जाणून घेतल्यामुळे त्यांची फसवणूक होता होता वाचली.

अजित रानडे यांचे दोन दिवसांपूर्वीच निधन झाले असून त्यांच्याकडून अशी कुठल्याही प्रकारची पैशांची मदत मागण्यात आलेली नसून कोणीही या खात्याशी आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन अजित रानडे यांचे भाऊ मिलिंद रानडे मुलगी श्रेया रानडे यांनी केली आहे.

- Advertisement -

याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलेली असून पोलिसांनी बनावट फेसबुक खाते तयार करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -