घरमुंबईसामाजिक कार्यकर्ते सार्वजनिक काका

सामाजिक कार्यकर्ते सार्वजनिक काका

Subscribe

सार्वजनिक काका हे महाराष्ट्रातील एकोणिसाव्या शतकातील एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते. त्यांचे पूर्ण नाव गणेश वासुदेव जोशी पण सार्वजनिक काका या नावाने सुपरिचित होते. त्यांचा जन्म ९ एप्रिल १८२८ रोजी वासुदेव व सावित्रीबाई या दाम्पत्यापोटी सातारा येथे झाला. त्यांचे इंग्रजी सातवीपर्यंतचे शिक्षण सातारा येथे झाले.

नोकरीच्या निमित्ताने ते पुण्यात आले (१८४८) आणि न्यायालयात कारकून म्हणून रुजू झाले. नंतर त्यांनी वकिलीची परीक्षा दिली (१८६५) आणि पुण्यातच ते वकिली करू लागले. वकिलीच्या व्यवसायाबरोबरच त्यांनी सार्वजनिक कामात रस घेतला. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेण्यास पुण्यातील कोणीही वकील पुढे येण्यास धजेना. अशा वेळी त्यांनी फडक्यांचे वकीलपत्र स्वीकारण्याचे धाडस दाखविले. ‘फडक्याला जसा फासावर चढवतील तसा मलाही चढवतील, यापेक्षा जास्त काही करणार नाहीत ना?’ असे निर्भय उद्गार त्यांनी यावेळी काढले होते.

- Advertisement -

सार्वजनिक काकांच्या समाजसेवेत सार्वजनिक सभेचा त्यांनी वाहिलेला कार्यभार व सभेचे स्थान महत्त्वाचे आहे. बॉम्बे असोसिएशनच्या धर्तीवर पुण्यात २ एप्रिल १८७० रोजी ‘सार्वजनिक सभे’ची स्थापना करण्यात आली. ही सनदशीर मार्गाने काम करणारी एक प्रमुख राजकीय संस्था होती. तिचे मुख्य सूत्रधार व पहिले चिटणीस गणेश जोशी होते. सभेचे राजकारण हे सनदशीर व इंग्रजांच्या मदतीनेच होणार होते. जोशी आणि रानडे यांनी मिळून आर्थिक, औद्योगिक आणि राजकीय स्वरुपांची अनेक कामे हातात घेतली आणि जनतेला जागृत व संघटित करण्याचे मौलिक काम केले. शिवाय जनतेची गार्‍हाणी व अडचणी सरकारदरबारी मांडण्याचे प्रयत्न या संस्थेमार्फत सार्वजनिक काकांनी केले.

न्यायमूर्ती रानडे यांच्याशी सल्लामसलत करून सार्वजनिक काकांनी १८७२ मध्ये स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा केला. लो. टिळक, म. गांधी यांच्या कितीतरी वर्षे अगोदर त्यांनी स्वदेशीची चळवळ सुरू केली होती. १२ जानेवारी १८७२ रोजी त्यांनी खादी वापरण्याची शपथ घेतली व ती आयुष्यभर पाळली. खादीचा वापर व त्यासाठी जाणीवपूर्वक प्रचार व प्रसार करणारे सार्वजनिक काका हे पहिले द्रष्टे देशभक्त होते. त्यांनी ‘देशी व्यापारोत्तेजक मंडळ’ या संस्थेची स्थापना करून शाई, साबण, मेणबत्त्या, छत्र्या इ. स्वदेशी वस्तूंचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी स्वतः आर्थिक झीज सोसली. जातिभेदाच्या अनिष्ट प्रथेला त्यांचा विरोध होता. त्यांनी १८७१ मध्ये पुण्यात ‘स्त्री विचारवती’ या नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे जातिभेद दूर करण्यासाठी हळदीकुंकू यासारखे उपक्रम आयोजित करण्यात आले.

- Advertisement -

सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी शेतकर्‍यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली (१८७३). या पाहणीतून शेतकर्‍यांच्या दारिद्य्राची माहिती प्रकाशात आली. १८७६-७७ मध्ये महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला असताना त्यांनी दुष्काळ फंड उभारून दुष्काळ समित्या नेमल्या. स्वस्त धान्याची दुकाने उघडली. सार्वजनिक सभेने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मोठे साहाय्य केले. तसेच सरकारने आपल्या ‘पब्लिक वर्क्स’ खात्यामार्फत दुष्काळग्रस्तांसाठी कामे सुरू करावीत म्हणून लढा दिला. अशा या महान सामाजिक कार्यकर्त्याचे २५ जुलै १८८० रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -