मुंबई : यंदा महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरी होत आहे. घराघरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेशाला आज शनिवारी पाचव्या दिवशी वाजतगाजत निरोप देण्यात आला. गणरायाची स्थापना झाल्यानंतर दीड दिवस, पाचव्या तसेच सातव्या दिवशी आणि अकराव्या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते. आज पाचव्या दिवशी सायंकाळी विधिवत पूजा केल्यानंतर लहानथोरांनी गणपतीसोबत गौरींनाही निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणा देत लहान, तरुण मंडळी गटागटाने जात होती. (Ganeshotsav 2023 Farewell to five day Ganesha idols from Mumbaikars)
हेही वाचा – बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांची ताकद…; अमित शाहांच्या मुंबई दौऱ्यादरम्यान सुप्रिया सुळेंचे लक्षवेधी ट्वीट
रात्री 9 वाजेपर्यंत मुंबईतील समुद्रात, नैसर्गिक तलावात आणि कृत्रिम तलावांत 44,619 गणेशमूर्तींचे विधिवत पूजाअर्चा करून विसर्जन करण्यात आले. या 44,619 गणेशमूर्तींमध्ये सार्वजनिक 306, घरगुती 39,895 गणेशमूर्तींचा समावेश आहे. तसेच गणेशमूर्तींसोबतच 4418 गौरींचेही विसर्जन करण्यात आले आहे. कृत्रिम तलावात 153 सार्वजनिक आणि 17,451 घरगुती अशा 19,079 गणेशमूर्तींचा समावेश आहे. याशिवाय 1475 गौरींचेही कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात आले.
हेही वाचा –पुढील तीन दिवस मान्सून सक्रिय राहाणार; वाचा, तुमच्या भागात कसा असणार पाऊस
मुंबई महापालिकेने गिरगाव समुद्र, खाडी, तलाव आदी 69 नैसर्गिक विसर्जन स्थळी आणि 191 कृत्रिम तलाव आदी विसर्जन स्थळी गणेश विसर्जनाची उत्तम व्यवस्था केली आहे. तसेच, नैसर्गिक विसर्जन स्थळी आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, जीवरक्षक, निरीक्षण मनोरे, शौचालये, पार्कींग आदींची व्यववस्था करण्यात आली आहे.कृत्रिम तलावातील गणेश विसर्जनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी दीड दिवसांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन यासर्व विसर्जन स्थळांवर सुरळीत पार पडल्यानंतर शनिवारी पाच दिवसांच्या तसेच गौरी गणपतीच्या बाप्पांना पंचपंक्वांनाच्या नैवेद्य आस्वाद देत त्यांची मनोभावे सेवा केल्यानंतर निरोप देत आहेत.