घरCORONA UPDATEदहिसरमधील मिनी धारावी असलेला गणपत पाटील नगर सील; दहिसरनेही शंभरी गाठली

दहिसरमधील मिनी धारावी असलेला गणपत पाटील नगर सील; दहिसरनेही शंभरी गाठली

Subscribe

दहिसरमधील मिनी धारावी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपत पाटील नगरचा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.

मुंबईच्या उत्तरेकडील सीमा रेषा असलेल्या दहिसरनेही अखेर शंभरी पार केली असून आता मुंबईतील सर्वच विभागांमध्ये कमीत कमी १०० आणि जास्तीत १३०० पेक्षाही अधिक रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, दहिसरमधील मिनी धारावी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपत पाटील नगरचा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे. परंतु त्यानंतरही लोकांकडून लॉकडाऊनचे पालन केले जात नसल्याने आता याठिकाणी एसआरपीएफला पाचारण करण्यात येत आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना पत्र पाठवून एसआरपीएफची तुकडी गणपत पाटील नगरमध्ये तैनात करण्याची मागणी केली आहे.

संपूर्ण मुंबईला कोरोनाचा विळखा पडलेला असून आतापर्यंत  १४ हजार ७८१ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईतील २४ विभागांपैकी केवळ दहिसरच्या आर-उत्तर विभागातच आतापर्यंत शंभर पेक्षा रुग्ण होते. त्यामुळे ही सीमा रेषा सुरक्षित असली तरी याठिकाणीही कोरोना रुग्णांनी शंभरी गाठली आहे. आतापर्यंत या दहिसरमध्ये ११५ पर्यंत रुग्ण आढळले आहेत. त्यात दहिसरमधील मिनी धारावी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गणपत पाटील नगरमध्ये मंगळवारपर्यंत दहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मागील आठवड्यापासून गणपत पाटील नगरकडे येणारा लिंक रोडच बंद करण्यात आला आहे. या नगरमध्ये एकूण १४ गल्ल्या असून ही पूर्ण वस्ती सील केली आहे. याठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले असले तरी कोणत्या ना कोणत्या बहाण्याने येथील नागरिक बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे या वस्तीत कोरोनाचा संसर्ग झाल्यास धारावी आणि वरळी कोळीवाड्यापेक्षा अधिक रुग्ण बाधित होवून मुंबईतील मोठा हॉटस्पॉट होण्याची भीती वर्तवली जात आहे.

- Advertisement -

दहिसरच्या आर-उत्तर विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या विभागात एकूण कोरोनाबाधितांची संख्या १११च्या वर पोहोचली असल्याचे सांगितले. येथील आकडा शंभरच्यावर असला तरी संपूर्ण मुंबईत सर्वात कमी रुग्ण असलेला हा विभाग आहे. परंतु येथील ८० ते ९० हजार लोकांची दाटीवाटीने वसलेली गणपत पाटील नगर हे मोठे आव्हान आहे. सुरुवातीला याठिकाणी दोन रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य सेविकांच्या मदतीने शिबिर राबवून येथील लक्षणे असलेल्या रुग्णांना बाहेर काढले. त्यानंतर सातत्याने तपासणी केली जात आहे. त्यानंतर एक-दोन अशाप्रकारे रुग्णांची संख्या वाढून आता दहापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे मागील आठवड्यात लिंक रोडसह वस्ती सिल केली आहे. तसेच यापेक्षा अधिकप्रकारे तपासणी करण्यासाठी तसेच लोकांनी बाहेर पडू नये यासाठी पोलिसांना पत्र देवून एसआरपीएफची तुकडी तैनात करण्याची मागणी केली आहे. हे जवान मिळाल्यानंतर येथील लोकांचा रॅपिट सर्वे करून लक्षणे असल्यांना बाजुला काढले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -